संगमनेर ब्रेकिंग! माजी नगराध्यक्षकाच्या घरावर सशस्त्र दरोडा, जीवे मारण्याची धमकी
Breaking News | Sangamner Crime: घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
संगमनेर: संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्लेखोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले.
या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी रतन मुर्तडक (वय ५६, धंदा-स्टोन क्रेशन, रा. चैतन्यनगर, संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी मंगळवारी (२२ जुलै) रात्री २.१५ ते पहाटे ३.५५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेसंदर्भात २३ जुलै २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
आरोपींमध्ये विश्वास निसाळ, अंकुश जेधे, संतोष गायकवाड, सनी धारणकर, राम डफेदार (सर्वांची पूर्ण नावे माहीत नाहीत, सर्व रा. संगमनेर) आणि इतर १० ते १२ अनोळखी इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांचा समावेश आहे.
या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६७०/२०२५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९ (४), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४) (५), ३५१ (४), आणि आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घरी येऊन गैरकायदेशीर मंडळी जमवली आणि अनधिकृतपणे त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीचा पुतण्या वैष्णव मुर्तडक याला मारहाण करण्याच्या उद्देशाने घराच्या दरवाजाला लाथा मारल्या. तसेच, फिर्यादीच्या मोटारसायकलींचेही नुकसान केले. आरोपींनी वैष्णव मुर्तडक याच्या फोनवर फोन करून शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींकडे काठ्या, गज, लोखंडी रॉड आणि गुप्ती यांचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Breaking News: Armed robbery at former mayor’s house, death threats