Home नाशिक मित्रांच्या दोन गटात सशस्त्र हल्ला व गोळीबार

मित्रांच्या दोन गटात सशस्त्र हल्ला व गोळीबार

Breaking News | Nashik Crime: हाणामारीचे पर्यावासन थेट सशस्त्र हल्ला व गोळीबारात झाले. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.

Armed assault and firing between two groups of friends

नाशिक रोड:  शनिवारी रात्री मित्रांच्या दोन गटात मागील भांडणाच्या कुरापतीचा तसेच आर्थिक देवाण घेवाणीचा वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचे पर्यावासन थेट सशस्त्र हल्ला व गोळीबारात झाले. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विहितगाव येथे राहणाऱ्या काही मित्रांमध्ये दीड वर्षापूर्वी हातउसनवार घेतलेल्या पैशाच्या वादातून दोन मित्रांमध्ये शनिवारी रात्री वाद  झाला. त्यानंतर हा वाद झाल्याचे समजताच तिथे आणखी काही मित्र जमा झाले. त्यामुळे या सर्वांनी एकमेकांवर हल्ले केले. या हल्ल्यात धारदार शस्त्र व बंदुकीचा वापर करण्यात आला. परिणामी गोळीबार करण्यात आला. त्यात सशस्त्र हल्ल्यात व गोळीबारात चार जण गंभीर जखमी (झाले असून, एकाच्या मांडीला बंदुकीची गोळी लागली, तर एकाच्या पायाला गोळी चाटून गेली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, की गणेश जमधडे व स्वप्नील हांडोरे हे दोघे जण मित्र होते. स्वप्नील हांडोरे याने एक ते दीड वर्षापूर्वी गणेश जमधडे याच्याकडून दीड लाख रुपये हातउसने घेतले होते. दोघे मित्र असल्याने जमधडे याने पैसे मिळतील या आशेने त्याने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले. मात्र, मुदत संपुनही स्वप्नील हांडोरे हा हातउसनवार घेतलेले पैसे देत नव्हता. याच आर्थिक वादातून सहा महिन्यांच्यापासून दोघांमध्ये वाद होऊन दुश्मनी वाढत गेली. गणेश जमधडे याने पैसे वसुलीसाठी स्वप्नीलकडे तगादा लावला. मात्र तो त्याला प्रतिसाद देत नसल्याने त्याला राग अनावर झाला. त्यामुळे, शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास स्वप्नील हांडोरे, त्याचा भाऊ दर्शन हांडोरे व विकी हांडोरे हे तिघे जण विहितगाव येथील मथुरा चौकात बसलेले होते. याबाबतचा सुगावा गणेश जमधडे याला लागला.

त्यानंतर त्याने आपले मित्र प्रतिक वाकचौरे, आकाश पवार, सौरभ लोंढे यांना सोबत घेऊन मथुरा चौकात येऊन हांडोरे बंधूंवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर दोघांमध्ये व त्यांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाली. गणेशने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरात दाखल हांडोरे बंधूंनीही त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गणेश जमधडे सोबत आलेल्या आकाश पवारच्या मांडीला बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी लागली. तर स्वप्नील हांडोरेच्या पायालाही बंदुकीची गोळी चाटून गेली. यावेळी परिसरात दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला. तसेच आरडाओरडा करण्यात आल्याने मथुरा चौकातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

तसेच या दोन गटामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघा जणांवर खासगी रुग्णालयात, तर एका जणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांतील गणेश जमधडे व विकी हांडोरे यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, याप्रकरणी बंदुकीतील मारलेली गोळी कोणी झाडली याचा तपास पोलिस करत असून, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी इतर संशयितांचा शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे या गोळीबाराची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Web Title: Armed assault and firing between two groups of friends

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here