समृध्दी महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गांवर पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिकेला अपघातात एका महिलेचा मृत्यू.
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात समृद्धी महामार्गांवर पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिकेला अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर, बाळासह सहा जण जखमी झाले. हे सर्वजण मुक्ताईनगर आणि छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी आहेत.
छत्रपती संभाजी नगरकडून मुंबई येथे शुक्रवारी बालकाला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना इगतपुरीच्या धामणगाव परिसरात पहाटे साडेचार वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका विरुद्ध बाजूच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर चार ते पाच वेळा उलटल्याने रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य पाहून हवालदार सतीश शेलार, राजाराम डगळे, गुरुदेव मोरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत जखमींना घोटीजवळील एसएमबीटी या सेवार्थ रुग्णालयात सरकारी वाहनाने दाखल केले.
या अपघातात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरहून संभाजी नगर येथे प्रसूतीसाठी गेलेल्या फेमिदाबी रउफ शेख (चौधरी) (वय ५५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. गुलाम खान (३३ , रा. मुक्ताई नगर), रहेमान खान (४७, नांदूर, जि. बुलढाणा), रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी सोहेल खान (२८, हरसूल, जि. संभाजी नगर), अशोक पाटील (४५, जालना रोड, जि.संभाजी नगर), रुग्णवाहिका चालक भगवान इंगळे (३५, रा. संभाजी नगर) यांच्यासह पाच दिवसांचे बाळ जखमी झाले.
Web Title: Ambulance accident on Samriddhi Highway Woman dies