अकोले: मुलीसह महिलेची आत्महत्या
भंडारदरा: अकोले तालुक्यातील चिंचोडी गावाच्या परिसरात एका विहिरीमध्ये ३२ वर्षीय महिलेने नवर्याशी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणास्तव आपल्या चार वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केली. या घटनेमुळे भंडारदरा परिसरात खळबळ उडाली आहे.
चिंचोडी येथील अनिता ईश्वर पवार या महिलेचा तिच्या नवर्याबरोबर किरकोळ वाद झाला होता. या वादातूनच घरातून रुसून निघून गेली होती. या वादाचा राग मनात धरून अनिताने चिंचोडी गावाबाहेरील विहिरीत आपली चार वर्षीय मुलगी रिद्धीसह उडी मारून सोमवारी मध्यरात्री आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणार्या एका इसमाने चिंचोडीचे पोलीस पाटील अंकुश मधे यांना विहिरीत महिलेसह लहान मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ राजूर पोलीस स्टेशनला संपर्क केला त्यानंतर पोलीस नि. पी. वाय. कादरी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मुलीच्या नातेवाइकानी जोपर्यंत तिचा नवरा व सासू घटनास्थळी येत नाही तोपर्यंत दोन्ही मृतदेह जागेवरून हालू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ तिच्या नवर्याला घटनास्थळी आणले असता नातेवाईक जास्तच आक्रमक झाले. कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत कादरी यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळली व दोन्ही मृतदेह राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. राजूर पोलिसांनी मयत महिलेच्या नवर्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहे.