अकोलेतील घटना: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात चालक जागीच ठार
अकोले: अगस्ति कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरचा अपघात (Accident) झाल्याने ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
आज गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अकोले तालुक्यातील राजूर जवळील कातळापूर शिवारात ही घटना घडली. रामेश्वर साईदास राठोड (वय 21) रा.पिशोर कोळंबी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद असे या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
ऊसतोड कंत्राटदार शिवनारायण मगन राठोड (रा.कन्नड) यांचे कडे रामेश्वर राठोड हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. अगस्ति कारखाण्यावर ऊस खाली करून तो परत चालला होता. चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पडत असतांना या हंगामातील ही पहिलीच दुर्दैवी घटना घडली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर, शेतकी अधिकारी सतीश देशमुख व सर्व शेती खात्यातील कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा राजूर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Akole driver of a tractor Accident transporting sugarcane was killed on the spot