अहमदनगरच्या गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट! भीषण आगीत..
Ahmednagar Gangamai factory fire: गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना, किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
अहमदनगर: औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग अतिशय भीषण असल्याचे सांगितले जात आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाथर्डी, शेवगाव, पैठण आणि अहमदनगर येथून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब रवाना झाले आहेत. कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
गंगामाई कारखान्याच्या डिसलेरी विभागाला लागलेल्या आगेमध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही अशी अधिकृत माहिती कारखाना प्रशासनने दिली आहे. या घटनेत सर्व कामगार सुखरूप असून दोन ते तीन कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत. कोणीही दवाखान्यात दाखल झालेले नाही. या कारखान्यात जवळपास 35 कामगार काम करतात. मात्र पाच वाजता सुट्टी होत असल्याने अनेक कामगार बाहेर पडले होते अशी माहिती प्रशासनाकडून देण्यता आलेली आहे.
शेवगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्यासुमारास मोठी आग लागली. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कारखान्याच्या परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात येत आहे. कारखान्यातील इथेनॉलनमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात येत आहे.
आगीची तीव्रता मोठी असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी कारखाना प्रशासन मोठी कसरत करत असून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. कारखान्याकडे कोणीही जावू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
Web Title: Ahmednagar Gangamai factory fire
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App