धक्कादायक! पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण
Ahmednagar Crime News: पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली.
नेवासा: अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर एका गटाने हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना नेवासा येथे घडली आहे.
नेवासा फाटा येथील तारापार्क, साईतेज कॉलनी, फाटके कॉम्पलेक्स व शांतीनगर वसाहतीतील वहिवाटीचा रस्ता खुला करुन मिळावा या मागणीसाठी येथील संतप्त महिला-पुरुषांनी एकत्र येत बुधवार (दि.30) रोजी दुपारी दोन वाजता नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावरील राजमुद्रा चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
या रास्ता रोको आंदोलनानंतर उपस्थित संतप्त महिला – पुरुष नागरिकांनी वहिवाटीचा रस्ता त्वरीत खुला करण्याची मागणी तहसीलदार संजय बिरादार यांच्याकडे केली व रास्ता रोको झाल्यानंतर या जमावाने डॉ.करण घुले यांच्या कुटुंबातील मालकी हक्काच्या असलेल्या जागेवरील वहिवाटीच्या रस्त्यावर तार कंपाऊंड केलेले असल्याचा आरोप आंदोलकांनी करुन हा रस्ता वहिवाटीसाठी खुला करण्याची मागणी तहसिलदार बिरादार यांच्याकडे केली. यावेळी उपस्थित असलेले कामगार तलाठी ए.बी.दिघे यांनी सदर पंचनाम्याचे वाचन आंदोलकांसमोर करुन सदरील रस्त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करुन पाहणी केली जाईल तो पर्यंत हा रस्ता नागरीकांची अडचण म्हणून तात्पुरता खुला करुन देत आहोत असे पंचनाम्यात नमुद केले असल्यामुळे जमावातील आंदोलकांनी विजयाच्या घोषणा दिल्या त्यानंतर आंदोलकांतील महिला पुरुषांनी तारकंपाउंड व रस्त्यावर असलेल्या पत्र्यांच्या टपर्या काढून टाकण्यासाठी धाव घेतली.
त्यामुळे चिडलेल्या घुले यांनी तहसीलदार बिरादार यांनी हा रस्ता खुला करून देण्याच्या निर्णयाची लेखी आम्हाला द्या अशी मागणी तहसिलदार बिरादार यांच्याकडे केली असता तहसिलदारांनी ही मागणी अमान्य केल्यामुळे घुले बंधूचा राग अनावर झाला्. करणसिंह भाऊसाहेब घुले, सत्यजित भाऊसाहेब घुले व ज्ञानेश्वर वसंत घुले यांनी तहसिलदार बिरादार यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.यावेळी आंदोलनातील जमावाने घुले बंधूवर सामुहिक हल्ला केला व जमावांनी घुले बंधूना पत्र्याच्या शेडमध्ये गेलेले असतांना हा जमाव घुले बंधूकडे चालून आला असता पोलीस हवालदार जयवंत तोडमल यांनी मोठे धाडस करुन घुले बंधूना बाहेर काढले.
हा रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको झाल्यानंतर जमाव हा रस्ता खुला करण्यासाठी गेला असता केवळ बंदोबस्तासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे व गुप्तवार्ता विभागाचे पोलीस हवालदार जयवंत तोडमल हे दोघेच घटनास्थळी हजर होते. अपुरे पोलीस संख्याबळ येथे उपस्थित असल्यामुळे हा वादावर पडदा टाकण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे तुफान हाणामार्या होत किरकोळ दगडफेक घडली.
धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार बिरादार यांच्या फिर्यादीवरून आता संबंधितांवर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
Web Title: Ahmednagar Crime Tehsildar beaten in presence of police
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App