अहिल्यानगर: बिबट्या पाठोपाठ आता सिंहाचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Breaking News | Ahilyanagar: शहरात सिंहाचा वावर वाढल्याने बिबट्या आणि सिंह यांच्या दुहेरी दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिक प्रचंड धास्तावले.
राहाता: शहरातील सदाफळ वस्तीवर सिंह दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहाता तालुक्यात बिबट्याने अनेक मुले व प्राण्यांचे बळी घेतले आहेत. तसेच प्राणघातक हल्ले करून मोठी दहशत निर्माण केली आहे. आता शहरात सिंहाचा वावर वाढल्याने बिबट्या आणि सिंह यांच्या दुहेरी दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. वनविभागाने तातडीने संबंधित ठिकाणी पिंजरा लावून सिंह व बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर तेथे सिंहच असल्याचा दावा केला आहे.
राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बिबटे मोठा धुमाकूळ घालत आहेत. दररोज कुठे ना कुठे पशुधनावर डल्ला मारत आहेत, तर कुठे नागरिकांवर हल्ले करत आहेत. यापूर्वी अनेक चिमुकल्यांना बिबट्याने (Leopard) आपली शिकार बनवले आहे. आता सिंहाची भर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सदाफळ वस्ती, मावलाया रोड या भागात एका रस्त्यावर बसलेल्या अवस्थेत काही मजुरांना सिंह दिसला. त्यांनी तो प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला, असे बोलले जाते.
खरोखर तो सिंह होता की नाही, याची पडताळणी वन विभागाने गांभीर्याने घेऊन संबंधित प्राण्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे. मात्र बिबट्या पाठोपाठ आता सिंहाचे दर्शन होऊ लागल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. शेतकरी व शेतमजूर आपल्या शेतात जाताना जीव मुठीत धरून जात आहेत. बिबट्या व सिंहाच्या दहशतीखाली नागरिक जीवन जगत आहेत. सिंह या भागात कुठून आणि कसा आला, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने भेडसावत आहे. नागरिकांनी वन विभागाने याबाबत सत्यता सांगितल्यानंतरच यावर विश्वास ठेवावा, अशी चर्चा सुद्धा सुज्ञ नागरिकांमध्ये आहे.
Breaking News: After the leopard, now the lion is on the move