Breaking News | Akole: Adhala Dam: देवठाण येथील १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण आज दुपारी काठोकाठ भरले.अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 योगेश जोर्वेकर यांनी दिली.
अकोले: अकोले तालुक्यातील देवठाण येथील १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण आज दुपारी काठोकाठ भरले.अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 योगेश जोर्वेकर यांनी दिली. आढळा धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोले तालुक्यातील सहा, संगमनेर तालुक्यातील आठ व सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील दोन अशा एकूण सोळा गावांचे धरण लाभक्षेत्र आहे. मातीच्या या धरणाची लांबी ६२३ मीटर तर महत्तम उंची ४० मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र १७७ चौरस मीटर आहे. अकोले ,संगमनेर व सिन्नर तालुक्यातील तीन हजार ९१४ हेक्टर धरणाचे सिंचन क्षेत्र आहे. धरणास दोन कालवे असून. उजवा कालवा ११.८० किलोमीटर तसेच डावा कालवा ८.८० किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून घेण्यात येतात.
या वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धरणात मुबलक प्रमाणात पाणी शिल्लक होते. तसेच मागील पंधरा दिवसांपासून धरणाचे पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणात पाण्याची समाधानकारक आवक होत असल्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरणारे धरण ३ जुलैलाच भरले.
अकोले तालुक्यातील देवठाण, विरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर निमगाव, चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा १६ गावांना शेतीसाठी आढळा धरणातून पाणी पुरवठा होत असतो. सध्या आढळा धरणातून २५ क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे शाखा अभियंता महेश सूर्यवंशी व कालवा निरीक्षक मयूर देशमुख यांनी सांगितले.
निसर्गाचं वरदान असलेल्या भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचे तांडव सुरू असल्याने धरणात येणार्या नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे बुधवारी (दि. 2) सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7 हजार 38 दलघफू (63.76 टक्के) तर निळवंडेचा पाणीसाठा 4 हजार 429 दलघफू (53.18 टक्के) झाला आहे.
Breaking News: Adhala dam in Akole taluka overflows