संगमनेरातील खाणपट्टेधारक, स्टोन क्रशरधारकांवर कारवाई, ७६५ कोटींचा दंड
Sangamner: गौणखनिजाचे अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाने ७६५ कोटी रुपयांचा दंड.
संगमनेर : गौणखनिजाचे अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाने ७६५ कोटी रुपयांचा दंड केला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या कारवाईत संगमनेर तालुक्यातील खाणपट्टेधारक आणि स्टोन क्रशरचे धारक अशा एकूण ५७ जणांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी, शिर्डी आणि श्रीरामपूर यांनी २० ऑक्टोबरला ईटीएस मशीनद्वारे गौण खनिजाची मोजणी केली होती. त्यानुसार, त्यांनी चौकशी करून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने अतिरिक्त उपसा केलेल्या गौणखनिजाचे रॉयल्टी ठरवून प्रशासनाने खाणपट्टेधारक आणि क्रशरचे धारक यांना नोटिसा बजावल्या.
गौणखनिजाचे अतिरिक्त उत्खनन केल्यानंतर बाजारभावाप्रमाणे किंमत ठरविण्यात आली. त्याच्या पाचपट दंड आणि मूळ किंमत असा एकूण ७६५ कोटींचा दंड केला असून, नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कायदेशीर पूर्तता करूनच कार्यवाही करण्यात आली आहे. ज्यांना आदेश मान्य नसेल, त्यांना उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांच्याकडे अपिल दाखल करता येणार आहे, असेही तहसीलदार निकम यांनी सांगितले.
Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम
या गावांमधील खाणपट्टे, स्टोन क्रशर
गौणखनिजाचे अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी संगमनेर तहसील कार्यालयाच्या वतीने ५७ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यात संगमनेर शहर व तालुक्यातील राजकीय आणि बड्या लोकांचा समावेश आहे. येलखोपवाडी, कोठे कमळेश्वर, मेंढवण, मेंगाळवाडी, नांदुरी दुमाला, करुले, कोकणगाव, कर्जुले पठार, खंदरमाळवाडी, डोळासणे, साकुर, मांची, पिंपळे, कसारे, बाळापूर, कन्हे, पारेगाव खुर्द, कोळवाडे, तळेगाव दिघे, पिंपरणे, वझरी खुर्द, अंभोरे या गावांमध्ये खाणपट्टे आणि स्टोन क्रशर आहेत.
संगमनेर तालुक्यातील दगड खाणपट्टाधारक व स्टोन क्रशरधारक यांना सुनावणीसाठी संधी दिली होती. त्या संधी दरम्यान त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. आवश्यक ती चलने व कागदपत्र सादर करण्याची संधीही त्यांना दिली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी, शिर्डी आणि श्रीरामपूर यांनी ११ नोव्हेंबरला त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना सादर केला. त्या अहवालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी १८ नोव्हेंबरला तहसील कार्यालय, संगमनेर यांना आदेशित केले. अतिरिक्त उत्खनन झालेल्या ठिकाणी संबंधितांना दंडात्मक आदेश पारीत करण्यात आले आहेत. – अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर,
Web Title: Action taken against mining lease holders, stone crusher owners
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App