संगमनेरात बोगस डॉक्टरवर कारवाई, पदवी व व्यवसाय परवाना नसतांना करीत होता उपचार
Sangamner Crime: बोगस डॉक्टर व त्याला मदत करणारा अशा दोघांविरुद्ध आश्वी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ.
संगमनेर: वैद्यकीय शाखेची कोणतीही अधिकृत पदवी व व्यवसाय परवाना नसतांना राजस्थान येथील बोगस डॉक्टर व त्याला मदत करणारा अशा दोघांविरुद्ध आश्वी येथील पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार संगमनेर कारखान्याच्या आश्वी येथील विभागीय गट कार्यालयात चालू होता.काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
इम्रान अब्दुल खान (राहणार भरतपुर राजस्थान) व मदतनीस भरत मधुकर वर्पे (रा कनोली ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.आश्वी बु (ता संगमनेर) येथील संगमनेर साखर कारखान्याच्या शेतकी विभाग गट ऑफिस च्या पाठीमागील खोलीमध्ये तोतया डॉ. इम्रान अब्दुल खान हा वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी तसेच व्यवसाय परवाना नसताना गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेवात,मणक्यातील गॅप,पॅरेलेसीस,मानेपासून ते तळ पायापर्यत नस चोकप होणे आदी आजारावर गोळ्या औषधे न देता आयुर्वेदिक इंजेक्शनने रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ तय्यब बाबुबाई तांबोळी व उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉ शहनाज शेख यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता तोताया डॉक्टर हा नाव नसलेल्या व्हायल मधून रुग्णांना इंजेक्सन देत असल्याचे आढळून आले.
घटनास्थळी १८ नाव नसलेल्या व्हायरल, ३ एम एल च्या प्रत्येकी २८ सीरींज तसेच डॉ हुसेन नाव असलेले व्हिजीटिगं कार्ड सापडले. संगमनेर साखर कारखान्याच्या गट ऑफिस मधील भरत मधुकर वर्पे याच्या साह्याने तोतया डॉक्टर वैद्यकिय व्यवसाय चालवत होता असे उघड झाले.
तोताया डॉक्टरकडे कोल्हार (ता राहाता) तसेच संगमनेर तालुक्यातील आश्वी,औरंगपुर,लोहारे कसारे, ओझर,मनोली आदी गावातील अनेक रूग्ण येत असत प्रत्येक रूग्णाकडुन ११०० रूपये प्रमाणे इंजेक्शन तसेच मालीश साठी तेल सदर तोतया डॉक्टर घेत होता असे तसेच दिनांक १६ मार्च रोजी तोताया डॉक्टरने जवळपास १८ रूग्णावर उपचार केले असल्याचे समजते. वैद्यकिय क्षेत्रातील कुठले ही पदवी नसलेला तोतया डॉक्टर संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिसमध्ये वैद्यकिय व्यवसाय कसा करू शकतो असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
वैद्यकिय अधिकारी डॉ तय्यब तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलिस ठाण्यात वैद्यकिय व्यवसाय करणाऱा तोताया डॉक्टर व त्याचा मदतनीस या दोघांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार अधिनियम कलम ३३ व ३६ तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Action taken against bogus doctor in Sangamner