संगमनेर: ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक जण जखमी
Sangamner Accident: कर्जूले पठार व डोळासणे सिमेवर भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीस्वाराला समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू.
संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावरील कर्जूले पठार व डोळासणे सिमेवर भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीस्वाराला समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला इसम गंभीर जखमी झाला.
हा अपघात बुधवारी दुपारी घडला. याबाबात माहिती अशी की ओम अर्जुन झनान (वय २२, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे तर बाबासाहेब दामोधर शेरमाळे (वय ४५, रा. समनापूर) असे या अपघातात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मयत ओम झनान व बाबासाहेब शेरमाळे हे दोघेही कर्जुले पठार येथे ट्रान्सफार्मरच्या कामासाठी आपली दुचाकी क्रमांक एमएच १४ सीएच १२०१ वरून चैन ब्लॉक घेऊन जात होते. याच दरम्यान कर्जुले पठार डोळासणे सीमेवर भरधाव वेगाने आलेला आयशर टेम्पो क्रमांक एमएच ०४ जीआर ७३१४ ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ओम झनान याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बाबासाहेब शरमाळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ उपचारासाठी संगमनेर रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान कर्जुले पठार डोळासणे शिवारात महामार्गाचे काम चालू असल्याने या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहने भरधाव वेगाने येत असतात. एकेरी वाहतूक असल्यानेच भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला समोरासमोर धडक दिली आणि यात एका तरूणाचा बळी गेला. या महामार्गावर या परिसरात अनेकवेळा भीषण अपघात घडत आहे. खराब रस्ते, वाहनांचा प्रचंड वेग, उतार यामुळे असे अपघात घडत असून प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Accident young man died, one injured in a collision with a truck
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study