ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
Solapur Accident: ४ वर्षीय लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण उसाच्या फडात सुरू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गेअरवर पडला.
सोलापूर: ४ वर्षीय लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण उसाच्या फडात सुरू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गेअरवर पडला. यावेळी ट्रॅक्टर तसाच पुढे गेल्याने दोघी बहिणी खाली पडल्या. यावेळी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन दोघी बहिणी जागीच मृत झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत घडली. ऊस तोडीच्या फडात दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६: १५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. निता राजु राठोड व अतिश्री राजु राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानुबाई राजु राठोड रा. पाटागुडा ता. जिवती जि. चंद्रपूर या पती राजु राठोड मुली ज्योती, निता, अतिश्री, भाग्यश्री, गिता व एक मुलगा अभिनंदन असे एकत्रीत राहतात. ते ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. २४/ डी.७१४७ या सोबत ऊस तोडणीचे काम करतात. दि.०७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६: १५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शानूबाई राठोड व त्यांचे पती राजु राठोड असे आष्टे ता. मोहोळ येथे कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करीत होते. ऊसाच्या बांधवर असलेला टॅक्टर क्र. एम एच. २४/ डी. ७१४७ हा चालक सुनिल गुलाब राठोड रा. डिगरस ता. कंदार जि. नांदेड याने तसाच चालू ठेवला होता. दरम्यान त्या ट्रॅक्टरमध्ये निता राजु राठोड (वय २०), ही लहान बहिण अतिश्री (वय ४ वर्ष) हिला कंबरेवर घेऊन चढ़त असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गेअरवर तिचा पाय पडला. त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या. चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या.
या प्रकरणी मुलींची आई शानुबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास अपघात विभागाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर हे करीत आहेत.
Web Title: Accident Two sisters died after being run over by a tractor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study