समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Breaking News | Samruddhi Highway Accident: जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यात नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी(३ जुलै) रात्री आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यात नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहे. हे सर्वजण पुण्याहून नागपूरला परत येत होते.मृतांची ओळख वैदही जैसवाल (२५), माधुरी जैसवाल (५२), राधेश्याम जैसवाल (६७) आणि संगीता जैसवाल (५५) अशी झाली आहे. तर गाडीचा चालक चेतन हेलगे (२५) गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत माहिती अशी की, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. गाडी अनियंत्रित होत महामार्गावर धडकली. या अपघातात राधेश्याम जैसवाल यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळावरच आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी संगीता जैसवाल आणि चालक चेतन हेलगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संगीता जैसवाल यांचा मृत्यू झाला. सध्या चालक चेतन हेलगेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Breaking News: accident on Samruddhi Highway Four members of the same family die