अहिल्यानगर: तरुण हात-पाय धुण्यासाठी गेला अन्….; दुर्दैवी मृत्यू
Breaking News | Shirdi: तरुणाचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
शिर्डी – शिर्डीतील साई आश्रया अनाथाश्रमाचे संस्थापक गणेश दळवी यांचा २० वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी याचा पिंपळवाडी गावातील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१९ जुलै २०२५) रात्री घडली असून, यामुळे शिर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.
अधिक माहिती अशी की, पिंपळवाडी गावात ग्रामपंचायतीच्या मालकीचे पाण्याचे तळे आहे. शिवम हा नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी तळ्याच्या परिसरात गेला होता. हात-पाय धुण्यासाठी तळ्याजवळ गेला असता, त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. ही घटना रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आणि राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तळ्यात शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवमचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला.
या घटनेची माहिती शिर्डीत पसरताच अनेक नागरिकांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे धाव घेतली. गणेश दळवी यांनी अनाथ मुलांसाठी साई आश्रया अनाथाश्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा शिवमच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शिवमच्या अकाली निधनाने शिर्डीतील सामाजिक वातावरण सुन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करीत आहे.
Breaking News: A young man tragically died after drowning in a lake