एका सेल्फीने घेतला दोन मित्रांचा जीव
Chandrapur Drowned two friends: दोघांचाही बुडून मृत्यू.
चंद्रपूर: मोबाईल हातात असला की सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. मात्र सेल्फी घेण्याच्या नादात काहींनी आपला जीव गमावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. सेल्फीच्या नादात दोन मित्रांनी आपला जीव गमावला आहे. तलावाजवळ सेल्फी घेत असताना एक मित्र पाण्यात पडला असता त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी मारली. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलाव परिसरात घडली. हार्दिक गुळघाने (वय 19) आणि आयुष चिडे (वय 19) अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलाव परिसरात ५ मित्र फिरण्यासाठी गेले होते.
सिंचन तलाव असलेल्या चारगावलगतच्या शेगाव येथील रहिवासी हार्दिक गुळघाने (19) सेल्फी काढण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिडे (19) सरसावला. मात्र तोही पाण्यात बुडाला. इतर मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारांच्या सहाय्याने दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मृतदेह आढळून आले. शेगाव पोलीस ठाण्याच्या चमूने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. दोन जीवलग मित्रांचा एकाचवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: A selfie took the lives of two friends