Ahilyanagar Car fire: जामखेड-बीड रस्त्यावरील मोहा घाटात अचानक आग लागून खाक झालेली कार.
जामखेड: जामखेड-बीड रस्त्यावर मोहा घाटाच्या शिवारात चालत्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना शनिवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजता घडली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आले. त्यांनी तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार खाक झाली. प्रसंगावधान राखल्याचे चालक बचावला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्याच्या मधोमध असलेले वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
शनिवारी रात्री वाहन चालक जयदीप संपतराव सुरवसे (रा.बीड) चारचाकी वाहनाने (क्रमांक एम.एच. ४६ एक्स २२६८) बीडवरून जामखेडमार्गे रत्नागिरीला चालले होते. रात्री नऊच्या सुमारास कार जामखेड-सौताडा रस्त्यावरील मोहा शिवारातून चालली होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका ट्रैक्टर चालकास कारच्या बोनेटच्या बाजूने आग निघत असल्याचे लक्षात आले. त्याने ही माहिती कार चालक जयदीप सुरवसे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर, प्रसंगावधान राखून सुरवसे तातडीने कारमधून खाली उतरले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यालगत असलेल्या हॉटेल चालकाने तातडीने पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे यांना मोबाइलवरून माहिती दिली. त्यांनी तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास माहिती देऊन घटनास्थळी येण्यास सांगितले.
पोलिस शिपाई देवा पळसे, ज्ञानेश्वर बेलेकर, पोलिस नाईक सतीश सरोदे, प्रकाश मांडगे, घोळवे यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिस, ग्रामस्थ, अग्निशमन दलाच्या साहाय्याने वाहनाची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्याच्या वेगामुळे वाहनाने चांगलाच पेट घेतला होता. आग आटोक्यात आणण्यात यश आले, तोपर्यंत वाहनाचा नुसता सांगाडा उभा राहिला. रस्त्याच्या मधोमध वाहन असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस कॉन्स्टेबल इंगळे यांना माजी सरपंच शिवाजी डोंगरे यांना फोन करून ट्रॅक्टर, रस्सी घेऊन बोलावून वाहतूक सुरळीत केली.
Web Title: A moving car caught fire in the ghat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study