अहिल्यानगर: पिकअपची दुचाकीला धडक; बाप-लेकीचा जागीच मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: दुचाकी आणि पिकअपच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू, पत्नी व मुलगा बचावले, ब्राह्मणी गावावर शोककळा.

सोनई : राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावरवंजारवाडी बस स्टँडजवळ सोमवारी (दि.२७) दुपारी दुचाकी आणि पिकअपच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून मृताची पत्नी आणि मुलगा सुदैवाने बचावले. राहुल नवनाथ पाटोळे (वय ३२, रा.ब्राह्मणी) व त्यांची लहान मुलगी रिया राहुल पाटोळे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. पत्नी सोनाली राहुल पाटोळे आणि मुलगा चैतन्य राहुल पाटोळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेने ब्राह्मणी परिसरात शोककळा पसरली.
राहुल पाटोळे हे पत्नी, मुलगी आणि मुलासह सोनईजवळील धनगरवाडी येथील सासरवाडीला गेले होते. पत्नीची भाऊबीज झाल्यानंतर दुचाकीवर ते सोमवारी दुपारी ब्राह्मणीकडे परतत होते. वंजारवाडी बस स्टैंड चौकात त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात आलेल्या पिकअपची धडक बसली. त्यात दुचाकीवरील राहुल पाटोळे आणि त्यांची लहान मुलगी रिया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नी व मुलगा जखमी झाले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. घटनेची माहिती मिळताच, ब्राह्मणीतील पाटोळे परिवारातील सदस्य घटनास्थळी आले. पोलिसांनी घटनास्थळाची पंचनामा करून मृतदेह नेवासा येथे हलवला. पाटोळे यांच्यापश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व दोन बहिणी असा परिवार आहे.
Breaking News: Pickup hits two-wheeler father and daughter die on the spot
















































