Home संगमनेर संगमनेर: चंदनापुरी घाटात कंटेनर दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर पलटी

संगमनेर: चंदनापुरी घाटात कंटेनर दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर पलटी

Breaking News | Sangamner: महामार्ग ठप्प  प्रवाशांचे हाल : दुचाकीला धडक देत दुभाजक तोडला, कंटेनर पुणेच्या दिशेने मालवाहतूक घेऊन जात असताना चंदनापुरी घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले.

Container overturns after hitting a biker at Chandanapuri Ghat

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला. मालवाहतूक करणारा एक मोठा कंटेनर दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून समोरच्या बाजूला पलटी झाला. या घटनेमुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, पुणे आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

कंटेनर पुणेच्या दिशेने मालवाहतूक घेऊन जात असताना चंदनापुरी घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले. कंटेनरने प्रथम समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर दुभाजक ओलांडत रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रवासी आणि वाहनचालक मोठ्या प्रमाणावर अडकून पडले, तर प्रवास करणाऱ्यांना उष्यामुळे आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रास सहन करावा लागला. अपघाताची माहिती पोलिस मिळताच संगमनेर ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कंटेनरचा पुढील भाग रस्त्याच्या कडेला ओढण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र कंटेनरचा मागील भाग रस्त्यावर अडकल्याने वाहतूक सायंकाळपर्यंत सुरळीत झालेली नाही. पोलिसांकडून वाहतूक नियमन करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. कोंडी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

अपघातामुळे सकाळपासूनच महामार्गावरील प्रवासात अडथळा निर्माण झाला. वाहने हळूहळू पुढे सरकत होती. पुणे आणि नाशिक या दोन्ही दिशांकडे जाणाऱ्या वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी अपघाताच्या ठिकाणी गर्दी केली होती, ज्यामुळे सुरुवातीला पोलिसांना बचावकार्य आणि वाहतूक नियंत्रणात अडचणी आल्या.

कंटेनर पलटी झाल्याने नाशिक- पुणे मार्ग बंद झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकीस्वार आणि कंटेनरचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान, महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे चंदनापुरी घाटातील वळणांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालकांनी वेग आणि नियंत्रणाबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Breaking News: Container overturns after hitting a biker at Chandanapuri Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here