अकोलेत आदिवासी दिनानिमित्त जनसागर लोटला, खोडा घालणार्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी – ना.एकनाथ शिंदे
Breaking News | Eknath Shinde in Akole: कार्यकर्त्यांना खोडा घालणार्याचा आगामी काळात बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी असणार आहे.
अकोले: अकोले हा आदिवासीबहुल तालुका आहे. आज खर्याअर्थाने आदिवासी दिनानिमित्त येथे जनसागर लोटला आहे हे पाहून मनस्वी आनंद झाला असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना खोडा घालणार्याचा आगामी काळात बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी असणार आहे, अशी तंबीही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले.
लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी कितीही वावड्या उठविल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत महायुतीचे सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री पदाच्या काळात अकोले तालुक्याला दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त शनिवारी (दि.9) अकोले बाजारतळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर हे होते. यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठल लंघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, उपजिल्हाप्रमुख नितीन औताडे, जगन देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ना. शिंदे यांनी आदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी हा जल, जमीन, जंगल, पर्यावरण यांचं संरक्षण करतो. राज्यघटनेने आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण कुणीही काढून घेऊ शकत नाही. लाडकी बहीण त्याचप्रमाणे शेतकर्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे 288 पैकी तब्बल 232 जागा महायुतीने जिंकत विधानसभेत विरोधी पक्षनेत्यासाठी लागणारे संख्याबळही विरोधकांना मिळाले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महायुतीचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा महायुती सरकारवर असणारा असलेला विश्वास आहे.
त्या विश्वासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी कधीही तडा जावू देणार नाही असे सांगतानाच पदे येतात, जातात, परत येतात. पण आपण एक कार्यकर्ता म्हणून नेहमीच तुमच्या सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांचा जाइंट किलर असा उल्लेख करताना व आमदार खताळ यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष दिली. तर आमदार खताळ यांनी 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी शासकीय सुट्टी घोषित करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांचे अकोले येथील महात्मा फुले चौकात आगमन होताच बाजारतळापर्यंत रॅली काढण्यात आली. रक्षाबंधनानिमित्ताने अनेक महिलांनी त्यांना राख्या बांधल्या. याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, लव्हाळवाडीच्या महिलांनी आदिवासी नृत्य सादर केले. अकोले नगरपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करुन विविध विकासकामांच्या मागणीचे निवेदनही दिले.
‘आपला भाऊच’आहे…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी दिनाची मिरवणूक लगतच्या रस्त्यावरून जात असताना डीजेचा मोठा आवाज सुरू असल्यामुळे त्यांनी ‘आपला भाऊच’आहे अशा शब्दांत याकडे दुर्लक्ष करत आपले भाषण सुरूच ठेवले.
Breaking News: my responsibility to take care of those who are causing trouble – Na. Eknath Shinde