संगमनेर: पत्नी झोपेत असताना कुऱ्हाडीने निर्घुण खुन, धक्कादायक कारण आले समोर
Breaking News | Sangamner Crime: चारित्र्याच्या संशयातून एका 65 वर्षीय पतीने आपल्या 60 वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर: चारित्र्याच्या संशयातून एका 65 वर्षीय पतीने आपल्या 60 वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) असून, आरोपी पती दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, घारगाव येथे राहणारे दगडू खंदारे हे शेती व्यवसाय करतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाने नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले. जेवणाच्या वेळी दगडू खंदारे यांनी पत्नी चंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यासोबत वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यांचा मुलगा भीमा खंदारे यांनी हस्तक्षेप करत वडिलांना शांत केले आणि दोघांनाही शेतातल्या घरात झोपायला पाठवले.
वडील शांत झाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी भीमा रात्री पुन्हा शेतातल्या घरी गेले. तिथे त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. तर वडील तेथे आढळून न आल्याने भीमा यांनी तात्काळ घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू खंदारे यांनी पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात आणि मानेवर धारदार कुऱ्हाडीने अनेक वार केले. या भीषण हल्ल्यात चंद्रकला खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
Breaking News: Wife brutally murdered with an axe while she was sleeping