संगमनेरातील दुकाने फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड
Breaking News | Sangamner Crime: दोन दुकाने फोडून सुमारे 6 लाख 66 हजार 910 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणार्या चोरट्यांच्या टोळीचा संगमनेर तालुका पोलिसांनी पर्दाफाश.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी (ता. संगमनेर) येथील सन मार्ट सुपर शॉपी आणि रॉयल अॅग्रो सर्व्हिसेस ही दोन दुकाने फोडून सुमारे 6 लाख 66 हजार 910 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणार्या चोरट्यांच्या टोळीचा संगमनेर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चौघा चोरट्यांना अटक करून 5 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पाचवा चोरटा हा विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अक्षय सुनील पाचोरे (वय 27, रा. चंदनापुरी) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचे रॉयल अॅग्रो सर्व्हिसेस व सागर नारायण रहाणे यांचे सन मार्ट सुपर शॉपी ही दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हे म्हसोबाझाप (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोहेकॉ. आशिष आरवडे, सचिन उगले, पोकॉ. प्रमोद चव्हाण यांनी पारनेर येथे जाऊन सखोल तपास करत भाऊसाहेब गंगाधर दुधवडे (वय 21), साहेबराव भाऊ दुधवडे (वय 30), एक विधीसंघर्षग्रस्त बालक (वय 16), संदीप उर्फ गोपी बारकू दुधवडे (वय 20), संजय बबन दुधवडे (वय 21) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना सोमवारी (दि.27) अटक करण्यात आली असून 30 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनाली आहे. सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोहेकॉ. आशिष आरवडे, सचिन उगले, अमित महाजन, प्रमोद चव्हाण, बाबासाहेब शिरसाठ आणि सचिन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.
Breaking News: Gang of thieves who broke into shops in Sangamner arrested