Breaking News | Rain Update: 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सकाळपर्यंतच्या 24 तासांत 410 दलघफू पाणी जमा झाले. साठा 9028 दलघफू (81.78 टक्के) झाला होता. सायंकाळी हा साठा 9331 दलघफू झाला.
भंडारदरा: उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योगाला चालना देणार्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात श्रावणसरींनी शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आणखी जोर धरल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने होऊ लागली आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने या धरणातूनही प्रवरा नदीत विसर्ग वाढविण्यात येत आहे.
पाणलोटात गत आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. पण काल शुक्रवारी सकाळपासूनच पाणलोटात पावसाचा जोर वाढला होता. शनिवारी हा जोर टिकून असल्याने डोंगरदर्यांमधील धबधबे जोमाने सक्रिय झाले असून ओढेनाले भरभरून वाहत धरणात विसावत आहेत. परिणामी धरणाची पातळी वाढू लागली आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सकाळपर्यंतच्या 24 तासांत 410 दलघफू पाणी जमा झाले. साठा 9028 दलघफू (81.78 टक्के) झाला होता. सायंकाळी हा साठा 9331 दलघफू झाला. पाऊस सुरूच असल्याने नियमानुसार जुलै अखेर 85 टक्के पाणीसाठा झाल्यावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो. पाऊस सुरू असल्याने 4355 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरूवात झाली होती. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.
निळवंडेतही पाण्याची आवक वेगाने होऊ लागली आहे. काल सायंकाळी 7269 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून 4835 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास तो आणखी वाढविण्यात येणार असल्याने प्रवरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणात पाण्याची आवक झाली.
गेल्या काही दिवसांपासून मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती काल शुक्रवार पासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीच्या पाणी प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. काल सकाळी मुळा नदी पात्रातून 5023 क्युसेस विसर्ग सुरू होता तर सायंकाळी सहा वाजता त्यात वाढ होऊन 23,076 क्युसेसने पाणी मुळा धरणाकडे झेपावत होते. त्यामुळे धरणात आज विक्रमी आवक होणार असून पावसाचा जोर टिकून राहिल्यास या धरणातून विसर्गही वाढविण्यात येणार आहे.
Breaking News: Discharge from reservoir increased, river becomes dry