अहिल्यानगर जिल्ह्यात 26 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार
Breaking News | Ahilyanagar Rain Update: जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 जुलै ते 29 जुलै दरम्यान जोरदार पाऊस कोसळणार.
राहाता: सध्या महाराष्ट्र व कर्नाटकमधील सीमाभागातील पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेला कमी दाबाचा पट्टा आंध्रप्रदेश, विदर्भ, मध्यप्रदेशमार्गे राजस्थानकडे मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 23 जुलै ते 30 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील विदर्भात जोरदार पाऊस होणार असून त्याचा प्रभाव मराठवाड्यातही असेल, असा अंदाज हवामान अभ्यासक आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला.
विदर्भात आणि मराठवाड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असली तरी या दोन्ही प्रणालीचा नाशिक, अहिल्यानगर तसेच धुळे, पुणे, सातारा, सांगली सारख्या जिल्ह्यांमधील सह्याद्रीच्या पर्जन्यछायेत, साधारणपणे शंभर सव्वाशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्याला लाभ होणार नाही. याच कालावधीत अरबी समुद्रातून येणार्या बाष्पयुक्त ढगांमुळे कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे. तसेच घाटमाथा वगळता नाशिक आणि अहिल्यानगरच्या उर्वरित भागात विशेषतः 26, 27, 28 जुलैला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. खरीप पिकाला यामुळे जीवदान मिळेल. परंतु त्यामुळे भुजल पातळीत फारशी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. 23 जुलै ते 30 जुलैपर्यंत आकाश ढगाळ राहून विखुरलेल्या स्वरूपात अधूनमधून स्थानिक ठिकाणी रिमझिम स्वरूपात पाऊस पडेल. त्यातल्या त्यात 26, 27, 28 जुलैला पावसाचे प्रमाण चांगले राहील.
गेले दहा-पंधरा दिवस पावसाचा खंड पडल्याने जिरायत भागातील खरीप पिकांना फटका बसला आहे. सध्या अरबी समुद्राचे तापमान तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्याने अरबी समुद्रामार्गे घाटमाथ्यावर ढग वाहून आणणार्या वार्यात फारसा जोर नाही. घाटमाथ्यापासून जेमतेम पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत त्याचे रिमझिम पावसाच्या रुपात थोडेफार अस्तित्व आहे. 29 जुलैच्या आसपास राजस्थान आणि पाकिस्तान सीमेलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढग गुजरात आणि राजस्थानकडे खेचले जाऊन त्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल. एकंदरीत 29 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात नाशिक अहिल्यानगरला पावसाचा मोठा खंड पडेल असे चित्र दिसत आहे.
Breaking News: Rainfall will increase in Ahilyanagar district after July 26