संगमनेर पोलीस दलात खळबळ! पोलिसाने घेतली लाच अन…
Breaking News Sangamner Bribe: कागदपत्रांच्या खर्चासाठी आणि ‘कायदेशीर कारवाई करण्याच्या बहाण्याने तब्बल चाळीस हजार रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली. सुरुवातीला कतारी यांनी रोख वीस हजार रुपये दिले.
संगमनेर: अहिल्यानगरच्या एलसीबी मधील पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच संगमनेर येथे एका धक्कादायक घटनेने पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक धनंजय महाले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत.
संगमनेर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीने हे प्रकरण सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
१९ जानेवारी २०२३ रोजी कतारी यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये एका फसवणुकीच्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कारवाई करण्याच्या नावाखाली पोलीस नाईक धनंजय महाले यांनी अमर कतारी यांच्याशी संपर्क साधला. कतारी यांच्या आरोपानुसार, महाले यांनी कागदपत्रांच्या खर्चासाठी आणि ‘कायदेशीर कारवाई करण्याच्या बहाण्याने तब्बल चाळीस हजार रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली. सुरुवातीला कतारी यांनी रोख वीस हजार रुपये दिले, तर उर्वरित वीस हजार रुपये कारवाई पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले.
कतारी यांच्या म्हणण्यानुसार, २० एप्रिल २०२३ रोजी धनंजय महाले यांनी त्यांना संगमनेरमधील एका हॉटेलजवळ बोलावून आणखी दहा हजार रुपये घेतले. अशा प्रकारे, एकूण ३०,००० रुपये रोख रक्कम दिल्यानंतरही महाले यांनी कतारी यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही. याउलट, कतारी यांनी वारंवार विचारणा केल्यावर महाले यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर धमक्या देण्यास सुरुवात केली. कतारी यांनी ६ जून २०२४ रोजी धनंजय महाले यांना पुन्हा संपर्क करून कारवाईबाबत विचारले असता, महाले यांनी कतारी यांना पोलीस स्टेशनबाहेर बोलावून धमक्या दिल्याचा गंभीर आरोप आहे.
कतारी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, धनंजय महाले यांनी केवळ पैशाची मागणी केली नाही तर अधिकृत कर्तव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांची फसवणूकही केली. हे लाचखोरी आणि सत्तेचा गैरवापर यांचे स्पष्ट प्रकरण म्हणून वर्णन केले आहे .
या संदर्भात, त्यांनी पुरावा म्हणून १९ जानेवारी २०२३ रोजी दाखल केलेल्या मूळ तक्रारीची छायाप्रत, त्यांच्या तक्रारीसह, महाले यांच्यासोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट आणि फोन कॉलशी संबंधित तपशील (स्क्रीनशॉट) सादर केले आहेत.
कटारी यांच्या या गंभीर आरोपांमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असताना, पोलिसांवरच अशा थेट आरोपांमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कतारी सह स्थानिक नागरिक करत आहेत. पुढील तपासात काय सत्य समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्वरित आणि पारदर्शक कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
Breaking News: Twenty Thousand rs bibe rupees were stolen under the pretext of taking legal action