अहिल्यानगर: पती पत्नीचा मृतदेह मिळाला, संशयास्पद मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा स्वतःच्या घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला. मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या.
लोणी: राहाता तालुक्यातील लोणी जवळच्या मूळगाव गोगलगाव (रा. सादतपूर) शेतकरी असलेल्या पती-पत्नीचा गुरुवारी एकाच दिवशी गूढ मृत्यू झाला. पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा स्वतःच्या घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला. मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांना घ्यावा लागेल.
रेवजी मुरलीधर गायकर (वय 60) व त्यांची पत्नी नंदा गायकर (वय 55) यांचा गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. गावापासून जवळच सादतपूर हद्दीत गायकर वस्तीवर राहणारे रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेत नोकरीत होते. पत्नी, एक मुलगा, तीन मुली असे त्यांचे कुटुंब. चारही मुलांचे विवाह झाले. मुली त्यांच्या सासरी गेल्या तर मुलगा नोकरीसाठी संभाजीनगरला गेला. घरी पती-पत्नी दोघेच होते. रेवजी यांनी तीन वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली. त्यांना पेन्शनही मिळू लागली. पोटापुरती शेती असल्याने दोघे शेतातील कामे करून चांगले जीवन जगत होते.
त्यांची एक मुलगी निमगावजाळी ता. संगमनेर येथे सासरी राहाते. तिने गुरुवारी सकाळपासून अनेकदा आई-वडिलांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तिने जवळच राहणार्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली. चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आवाज देऊनही काहीच प्रतिउत्तर न आल्याने दरवाजा पूर्ण उघडून बघितले असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. राहाता तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष त्र्यंबक गायकर घटनास्थळी पोहचले. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी आश्वी पोलिसांना कळवले.
दरम्यान, रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करून ते प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. घटनेने गोगलगावमध्ये शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच याच गावात दोन भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. रेवजी व नंदा यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सध्या कुणीच सांगू शकत नाही.
रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कुणी पाजले, हे तपासात समोर येईल. नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचा घातपात झाला, याचाही तपास आश्वी पोलिसांना करावा लागणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Breaking News: Body of husband and wife found, suspicious death