अहिल्यानगर: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याची घटना. (abused)
अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय 17) सोमवारी (30 जून) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्जत शहरात राहणार्या संशयित अल्पवयीन मुलाविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुलगी ही जामखेड तालुक्यातील एका गावात राहत असून, ती कर्जत येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. डिसेंबर 2024 मध्ये तिची ओळख संशयित आरोपीशी व्हॉट्सअॅपवर झाली. पुढे जानेवारी 2025 मध्ये त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट कर्जत येथील एका कॅफेमध्ये झाली. तेव्हापासून दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. मुलाने वेळोवेळी तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत तिला प्रेमजाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला तिने नकार दिला. त्यानंतर पीडिता नीट परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. त्यादरम्यान मुलाने तिला भेटून तिच्यासोबत फोटो काढले.
पुढे काही दिवसांनी जेव्हा तिने त्याच्याशी बोलणे थांबवले, तेव्हा मुलाने तिला आपले फोटो तुझ्या वडिलांना दाखवीन अशी धमकी दिली. घाबरून ती त्याच्याशी बोलू लागली. त्यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी, मुलाने तिला दिल्लीगेट, अहिल्यानगर येथून दुचाकीवरून अहिल्यानगर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिने नकार देऊनही, फोटो दाखवण्याची धमकी देत मुलाने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेली पीडिता तिच्या मामाकडे भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील एका गावात राहायला गेली. मात्र, 16 मे 2025 रोजी संशयित मुलगा तिथे पोहचून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर मुलाने तिच्या चुलत भावांना फोन करून तुझ्या बहिणीचे व माझे अफेअर आहे, मी तिचे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. यानंतर पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. सोमवारी पहाटे नातेवाईकांसह तोफखाना पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अल्पवयीन मुलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोंटला करीत आहेत.
Breaking News: Repeated abused threatening to make the photo viral