Home अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये बनावट नोटा बनवणारं मोठं रॅकेट उघड, घरातच सुरू होता नोटा बनवण्याचा...

अहिल्यानगरमध्ये बनावट नोटा बनवणारं मोठं रॅकेट उघड, घरातच सुरू होता नोटा बनवण्याचा कारखाना

Breaking News | Ahilyanagar Crime: जिल्ह्यातील बनावट नोटांचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत ६६ लाख रुपये किमतीच्या नकली नोटांसह नोटा तयार करण्यासाठी लागणारे ४ लाख रुपये किमतीचे साहित्य, असे एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचे सामान जप्त.

big racket of making fake notes exposed in Ahilyanagar, note making factory

अहिल्यानगर:  राहुरी- पोलिसांनी अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील बनावट नोटांचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत ६६ लाख रुपये किमतीच्या नकली नोटांसह नोटा तयार करण्यासाठी लागणारे ४ लाख रुपये किमतीचे साहित्य, असे एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचे सामान जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना २८ जून रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, तीन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवर (एमएच ४५ वाय ४८३३) नगरहून राहुरीकडे बनावट नोटा घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राहुरी शहरातील नगर-मनमाड रोडवरील एका महाविद्यालयासमोर सापळा रचला. या सापळ्यात पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, रा. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय ४२, रा. कर्जत) आणि तात्या विश्वनाथ हजारे (वय ४०, रा. पाटेगाव, ता. कर्जत) हे तिघे जण पकडले गेले. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे चलनातील बनावट नोटा आढळून आल्या. खासगी बँकेचे अधिकारी कैलास वानी यांना बोलावून या नोटांची तपासणी केली असता, त्या नकली असल्याचे स्पष्ट झाले.

भाड्याच्या घरात नोटा तयार करण्याचं मशिन

आरोपींनी चौकशीदरम्यान करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी, शीतलनगर येथील समाधान गुरव यांच्या भाड्याने घेतलेल्या इमारतीत बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि तिथे नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र, संगणक, प्रिंटर, कटिंग मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट आणि नोटा मोजण्याची मशीन असे साहित्य जप्त केले. या साहित्याची एकूण किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. याशिवाय, पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटांचे ७५ बंडल (३७ लाख ५० हजार रुपये), दोनशे रुपये किमतीच्या बनावट नोटांचे ४४ बंडल (८ लाख ८० हजार रुपये) आणि कटिंग न केलेल्या पाचशे रुपये किमतीच्या नोटांचे कागदाचे बंडल (१८ लाख रुपये) असा एकूण ६६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने बनावट नोटांचे उत्पादन आणि वितरण यांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख, सुदाम शिरसाट आणि राजू जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. यातील एका आरोपीवर यापूर्वी कुडूवाडी (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो २२ महिने तुरुंगात होता. सध्या या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांचा व्यवहार रोखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Breaking News: big racket of making fake notes exposed in Ahilyanagar, note making factory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here