तरुणाने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक
नेवासा: नेवासा तालुक्यातील भानसाहिवरा येथे २८ एप्रिल रोजी शेजारी राहणाऱ्या महिलेच्या एटीएम ची माहिती घेऊन तिच्या खात्यावरील प्रधानमंत्री जनधन योजनेचे व रमाई आवास घरकुल योजनेचे जमा झालेले ४६ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
प्रसाद अशोक ससाणे वय २२ असे आरोपीचे नाव आहे. त्याने शेजारी राहणाऱ्या शोभा विजय साळवे यांची फसवणूक केली आहे. शोभा साळवे यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री जनधन योजना व रमाई आवास घरकुल योजनेचे पैसे जमा झाले होते. ही बाब प्रसाद ससाणे याला माहिती होती. ससाणे यांनी त्यांच्या एटीएम ची माहिती घेतली. त्यांनतर स्वतः च्या पेटीएम खात्याच्या माध्यामातून पैसे काढून घेतले. यासाठी त्याने साळवे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकाचा वापर करून नंतर तो डिलीट केला.
खात्यातून पैसे गेल्यानंतर साळवे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी ज्या एटीएम खात्यातून पैसे गेले त्याची माहिती घेतली तेव्हा प्रसाद ससाणे याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ससाणे याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Website Title: Cyber Crime Fraud by withdrawing money from a woman’s account