‘त्या’ बोलीवर मुलीसोबत लग्न ठरवण्यात आलं होतं; वैष्णवी हगवणेंच्या वडिलांनी दिली धक्कादायक माहिती
Vaishnavi Hagwane Suicide: लग्नानंतरही वैष्णवीचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
पुणे: पुण्यात एका अत्यंत धक्कादायक प्रकरणात, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र तुकाराम हगवणे यांच्या सुनेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईवडिलांनी गंभीर आरोप केले असून, हुंड्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी मोठा दबाव आणला होता, असा दावा त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी त्यांच्या सुनेच्या कुटुंबियांकडून तब्बल ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी हुंड्यात घेतली होती. इतकेच नव्हे, तर सनीज वर्ल्ड येथे विवाह करून देण्याच्या बोलीवर हे लग्न ठरवण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.
वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. १६ मे रोजी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरही वैष्णवीचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद कासपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह एप्रिल २०२३ मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर लगेचच हागवणे कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी सुरू केली. वैष्णवी गर्भवती असताना तिच्या पतीने पितृत्व नाकारले आणि तिला शारीरिक इजाही पोहोचवली, असा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे वैष्णवी माहेरी निघून गेली होती, जिथे तिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर सासरच्यांनी तिला परत आणले, पण छळ सुरूच राहिला.
दोन कोटींची मागणी –
नोव्हेंबर २०२३ मध्ये शशांक हगवणे याने वडीलांकडून जमीन खरेदीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे वैष्णवीला “फुकट पोसणार का?” अशी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर तिने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मार्च २०२५ मध्ये वैष्णवीला गाडीत बसवून वाकड येथे आणले गेले. वाटेत सासू आणि नणंदेने तिच्यावर मारहाण केली. वैष्णवीने “मी उडी मारेन” असे म्हटल्यावर मारहाण थांबवण्यात आली.
शेवटचा दिवस: शारीरिक जखमा आणि मृत्यू-
१६ मे रोजी सायंकाळी शशांक हगवणे याने प्रणव बहिरट याला कॉल करून सांगितले की, वैष्णवीने फाशी घेतली आहे. वैष्णवीला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या दोन्ही हातांवर, मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर आणि गळ्याजवळ तसेच गळ्याच्या हनुवटीवर लालसर व्रण दिसत होता जखमेच्या खुणा होत्या. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानुसार कलमे वाढवली जाणार आहेत.
Breaking News: Vaishnavi Hagwane Suicide