Home अहिल्यानगर विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली ? योगायोग नक्कीच नाही

विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली ? योगायोग नक्कीच नाही

Sangamner Factory Election: संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ यांनी दिली.

Sangamner Factory Election Thorat vs Vikhe

संगमनेर: अहिल्यानगरच्या राजकारणात आज (बुधवार) मोठी घडामोड घडली. संपूर्ण जिल्ह्याचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते.

परंतु या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ यांनी दिली. तर तिकडे विखे कारखान्याचीही निवडणूक न लढवण्याबाबत विरोधकांत एकमत झालं. विखे-थोरात यांचं राजकीय वैर विधानसभा निवडणुकांनंतर चांगलंच वाढलं. त्यात गणेश कारखाना थोरातांनाही कोल्हेंच्या मदतीने हिसकावून घेतला.

त्यामुळे विखे हे थोरातांना आणि थोरात हे विखेंना कारखाना निवडणुकीत चांगलाच धोबीपछाड देतील आणि कारखान्याच्या निवडणुकात एक वेगळाच राजकीय संघर्ष पाहायला मिळेल अशी आशा नगरकरांना होती. परंतु झालं वेगळंच. दोन्ही कारखाने विरोधकांनी माघार घेतल्याने अर्थात विखे कारखान्याच्याबाबतीत थोरातांनी तर संगमनेर कारखान्याच्या बाबतीत विखेंनी माघार घेतल्याने निवडणुका बिनविरोध झाल्या.

विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली?

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि., प्रवरानगरची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणे आणि दुसरीकडे लगेच संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूकही बिनविरोध होणं हा काही योगायोग नक्कीच नाही.

त्यामुळे या निवडणुकीच्या बाबतीत विखे-थोरात या दिग्गजांची आतून सेटलमेंट झाली असावी अशा चर्चा आता सुरु झाल्यात. निवडणुकीच्या काही दिवस आधी आ.खताळ यांनी थेट थोरातांना उलथून टाकण्याच्या गप्पा केल्या. आणि दोनच दिवसांत सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेवून यंदाची निवडणूक लढविणार नसल्याचे कारण देत त्यांनी माघार घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असोत किंवा माजी मंत्री बाळासाहेब थोरात असोत हे सहकारातील नेते. विरोध कोठे करायचा आणि एकत्र मिळून कोठे खायचे हे त्यांना चांगलेच माहित.

सहकारात संघर्ष करण्याइतपत हे नेते दुधखुळे नक्कीच नाहीत. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या वाटेतील अडसर न बनता ज्याचा कारखाना त्याच्या ताब्यात ठेवायचा या निर्णयाप्रत आले आणि आतून सेटलमेंट करत त्यांनी सहकारातील आपले वर्चस्व अबाधित ठेवले अशी चर्चा आता राजकीय जाणकार करू लागले आहेत. आता खरे काय नि खोटे काय पण जे झाले त्याने मात्र सहकारातील संघर्ष टळला आहे पण दुसरीकडे विखे-थोरात संघर्ष पाहण्याची प्रतीक्षा असणाऱ्यांची मात्र निराशा झाली हे नक्की.

Web Title: Sangamner Factory Election Thorat vs Vikhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here