Home संगमनेर संगमनेर बसस्थानकाच्या जागेत शिवजयंतीच्या परवानगीसाठी दोन गट एकमेकांना भिडले

संगमनेर बसस्थानकाच्या जागेत शिवजयंतीच्या परवानगीसाठी दोन गट एकमेकांना भिडले

Sangamner Stand Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी होणारी जयंती कोण साजरी करणार याबाबत शिवसेना (शिंदे गट), शिवजन्मोत्सव सोहळा समिती (आ. तांबे) यांच्यामध्ये चांगली जुंपली.

Two groups clashed over permission for Shiv Jayanti at Sangamner bus stand

संगमनेर:  संगमनेर बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी होणारी जयंती कोण साजरी करणार याबाबत शिवसेना (शिंदे गट), शिवजन्मोत्सव सोहळा समिती (आ. तांबे) यांच्यामध्ये चांगली जुंपली होती. दोन्ही गटांमध्ये काल बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी वाद होऊन दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करत भिडले. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा वाद थोड्याफार प्रमाणात निवळला. त्यानंतर रात्री साडे आठच्या सुमारास प्रशासनाने दोन्ही गटांशी संपर्क साधून या जागेतच दोन्ही गटाला वेगवेगळ्या जागा देऊन प्रकरणावर तोडगा काढल्याची माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली.

गेल्या चार दिवसांपासून संगमनेर बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी, यासाठी शिवसेना (शिंदे गट) व शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.सत्यजित तांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रविवार दिनांक 9 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी भूमिपूजन केले होते. त्यानंतर या भूमिपूजनाला शिवसेनेने आक्षेप घेतला आणि दोन्ही गटांमध्ये मोठा वाद सुरू झाला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या कार्यालयात कोणाला परवानगी द्यावी? याबद्दल चर्चा सुरू होती. परंतु कोणताही निर्णय यावेळी झाला नाही. दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा दोन्ही गट संगमनेर बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत आमने सामने आले.

या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांना धक्काबुक्की करत भिडले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून दोघांना शांत केले. याबाबत रात्री उशिरा जिल्हा पोलीस उपअधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार धिरज मांजरे, शहर पो. नि. रवींद्र देशमुख, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दोन्ही गटाला संपर्क करून या वादग्रस्त जागेतील दक्षिण बाजूस शिवजन्मोत्सव सोहळा समिती व उत्तरेस शिवसेना (शिंदे गट) यांना शिवजंयती साजरी करण्यास परवानगी दिली. तसेच दोन्ही मिरवणुकीमध्ये प्रत्येकी दोन तासांचे अंतर ठेवण्याच्या सुचना केल्या. या सर्व बाबींवर दोन्ही गटाचे एकमत झाल्याने या वादावर पडदा पडला.

संगमनेर बसस्थानकाच्या जागेत कोण शिवजंयती साजरी करणार या वादावर प्रशासनाने दोन्ही गटांना संपर्क साधून जागा निश्चित केल्या. याबाबत दोन्ही गटांचे एकमत झाल्याने हा संघर्ष निवळला. तसेच दोन्ही मिरवणुकीमध्ये दोन तासांच्या अंतराची सूचना केली. तसेच हा तोडगा निघल्यानंतर शिवसेनेला (शिंदे गट) दिलेल्या जागेचे आ. अमोल खताळ यांनी रात्रीच भुमिपूजन करून कार्यकर्त्यांना शांततेत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

Web Title: Two groups clashed over permission for Shiv Jayanti at Sangamner bus stand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here