धक्कादायक! आधी तरुणीची आत्महत्या, मग त्याच गावातील तरुणाने विष प्राशन करून…..
Breaking News | Bhandara Crime: एका तरुण आणि तरुणीने आत्महत्या करण्याचा निर्णय.
भंडारा : एकाच गावातील एका तरुण आणि तरुणीने आत्महत्या करण्याचा टोकाचं निर्णय घेतला. काल तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली, तर आज तरुणाने विष प्राशन करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनांमुळे गावात चर्चांना उधाण आले आहे. या दोघांनी प्रेमप्रकरणातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न जोडले होते.
मानसिक तणावात असलेल्या एका वीस वर्षीय तरुणीने स्वतःच्या राहते घरी दि. ७ मार्च रोजी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास लाकडी मयालीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली. प्रणाली रवी भुरले असे मृत तरुणीचे नाव आहे.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर तरुणी लाखांदूर येथील एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. काही दिवसापूर्वी तिचे लग्न जुळून साक्षगंध झाले होते. दि. ७ मार्च रोजी घराच्या बाजूला असलेल्या पडवीत लाकडी मयालीला स्वतःची ओढणी बांधून गळफास घेतल्याचे घरच्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच शेजारील लोकांच्या मदतीने बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे उपचाराची सोय नसल्याने व तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिला मृत घोषित करण्यात आले. तरुणीने आत्महत्या का केली हे गुलदस्त्यात आहे. दिघोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असतानाच गावात दुसरी घटना घडली. दुसऱ्या दिवशी आज ८ मार्च रोजी जैतपूर येथील एका तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रंजित दामू घटारे या ३० वर्षीय तरुणाने आज सकाळी १० वाजताच्या सुमारास कीटकनाशक औषधं प्राशन करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे घरच्यांचे लक्षात येताच त्याला भंडारा येथे उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. सदर तरुणाचे सुद्धा साक्षगंध झाले होते . सलग दोन दिवस एका मागे एक आत्महत्येच्या घटना घडल्याने गावात तर्कवितर्काना उधाण आले आहे. दिघोरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: First the young woman committed suicide, then a young man attempt suicide