चारित्र्यावर संशय, महिलादिनी बायकोवर चाकूने सपासप वार
Bhandara Crime News : चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर प्राणघातक हल्ला.
भंडारा: भंडाऱ्यात नवऱ्याने बायकोवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलादिनीच नवऱ्याने बायकोवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
भंडाऱ्याचा तुमसर शहरातील रामकृष्ण नगरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळ्यावर धारदार चाकूने वार केला. जागतिक महिला दिनीच नवऱ्याने बायोकवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. कुंदा भुपेंद्र पाहुणे (२५), रा. रामकृष्ण नगर, तुमसर असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भुपेंद्र पाहुणे (३५) रा. रामकृष्ण नगर, तुमसर, असे आरोपी पतीचे नाव आहे.
जागतिक महिलादिनी पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. घटनेच्या दिवशी आरोपी पती भुपेंद्र पाहुणे याने पत्नी कुंदा पाहुणे ही घरी झोपली असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पती पत्नीचा वाद विकोपाला गेला. आरोपी पतीने रागाच्या भरात हातात चाकू घेऊन पत्नी कुंदाच्या गळ्यावर दोन्ही बाजूने वार केला. या हल्ल्यात ती रक्तबंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान तिला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली असून आरोपी पती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहे.
Web Title: Character doubt, wife stabbed repeatedly on Women’s Day