Breaking News | Sangamner: शहरात अनधिकृतपणे सुरू असलेले पाच कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले.
संगमनेर : शहरात अनधिकृतपणे सुरू असलेले पाच कत्तलखाने सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेने नोटिसा बजावूनही दुर्लक्ष करण हे कत्तलखाने सुरूच होते. त्यामुळे गुरुवारी (दि. 20) नगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू होते. याची माहिती पोलिस व पालिका प्रशासनाला होती. मात्र पोलिस तात्पुरती कारवाई करत असल्याने याचा फायदा हे कत्तलखाना चालक घेत होते. शहरातील जमजम कॉलनी, मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयामागील रमाई गार्डनच्या शेजारी पाच अवैध कत्तलखाने सुरू होते. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. पालिकेने या सर्व अनधिकृत कत्तलखाना मालकाला नोटिसा बजावून ते काढून घेण्यास सांगितले होते. तरीही हे अनधिकृत कत्तलखाने सुरूच राहिल्याने अखेर नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गुरुवारी (दि 20) संयुक्त मोहीम राबवली. सकाळी 10 वाजता मोहीम सुरू झाली. या वेळी काही कत्तलखाना चालकाने सुरुवातीला थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसबळापुढे काहीच निभाव लागला नाही.
मुख्याधिकारी रामदास कोकरे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, अभियंता महेश गोर्डे यांच्यासह कर्मचारी जेसीबी, ट्रॅक्टर व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सोबत पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.
सुमारे सहा तास ही कारवाई सुरू होती. यापुढेदेखील अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा सुरू राहणार असून कत्तलखान्यांची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अवैध कत्तलखान्याबाबत नऊ जणांना नोटिसा दिल्या होत्या. चार जणांनी कत्तलखाने बंद करून त्याचे रूपांतर घरात केले होते. मात्र इतर पाच जणांचे कत्तलखाने सुरूच असल्याने कारवाई करण्यात आली.
Web Title: Action on five slaughterhouses in Sangamner