संगमनेर: टेम्पो घरात घुसला; भींत अंगावर पडून चारजण गंभीर जखमी
Breaking News | Sangamner Accident: मालवाहू टेम्पो थेट पत्र्याच्या घरात घुसल्याने भिंत अंगावर पडून चारजण गंभीर जखमी.
संगमनेर: शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथे मालवाहू टेम्पो थेट पत्र्याच्या घरात घुसल्याने भिंत अंगावर पडून चारजण गंभीर जखमी झाले. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर राजू मनोहर थोरात, सायली राजू थोरात व जुली राजू थोरात हे सर्वजण मंगळवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास मालवाहू टेम्पो (क्रमांक एमएच.17, सीव्ही.1110) चा चालक अतिष विलास देवकर याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो थेट थोरात यांच्या घराची भिंत तोडून सरळ घरात घुसला.
यामुळे एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी मोठ्याने आरडा-ओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील सदस्यांच्या अंगावर भिंत व पत्रे पडले होते. नागरिकांनी पत्रे बाजूला काढून जखमींना बाहेर काढले आणि औषधोपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, दैव बलवत्तर असल्याने थोरात कुटुंब हे या अपघातातून बालंबाल बचावले आहे, अन्यथा मोठी घटना घडली असती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान टेम्पो घरात घुसल्याने या घटनेमुळे थोरात कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.
Web Title: Accident Tempo broke into the house Four people were seriously injured