जरांगेंनी घोषित केल्या जागा; मतदारसंघही फायनल, कुठे देणार उमेदवार?
Jarange Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती. (Manoj Jarange Patil).
मुंबई : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी काही मतदारसंघ देखील निवडले आहेत. याबाबत आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील अधिकृत माहिती देणार आहेत. मात्र, त्याआधी जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघांतून लढण्यासाठी यादी घोषित करायला सुरुवात केली असून काही मतदारसंघांची नावेही जाहीर केली आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली. तसेह केज मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असून गेवराई आणि आष्टीबाबत चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. यासोबतच जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर मतदारसंघात देखील लढविण्याचे ठरवले असून आज संध्याकाळपर्यंत एकूणच किती मतदारसंघ लढवायचे आणि उमेदवार कोण असणार हे स्पष्ट करणार आहोत. तसेच सोबत असलेल्या इतर समाजासाठीही राखीव जागांवर मनोज जरांगे पाठिंबा देणार आहेत.
आज अंतरवाली सराटीमध्ये सर्व मतदारसंघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय एकत्रित चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात आला. ज्या मतदारसंघांमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित असे समीकरण जुळेल त्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आला. ज्या मतदारसंघांमध्ये समीकरण जुळणार नाहीत, उमेदवार असणार नाहीत, त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये जी भूमिका होती तीच भूमिका राहील असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अंतरवालीतील उपोषणातून महाराष्ट्राला माहिती झालेल्या मनोज जरांगे यांनी आता थेट राजकारणात एन्ट्री केल्याचं दिसतं आहे.आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण निवडणुकीत उतरणार असे त्यांनी सांगितलं होते. त्यानुसार मनोज जरांगे पाटील आता विधानसभेला आपले उमेदवार उतरवत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी त्या उमेदवारांना फॉर्म भरून ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता आपण सांगू त्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे आणि जो उमेदवार ठरवू त्याला मदत करायची अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
लढवणार असलेले मतदारसंघ
बीड
मंठा
परतूर
फुलंब्री
पाथरी
हाथगाव
धाराशीव-कळंब
दौंड
पर्वती
पाथर्डी
कोपरगाव
शेवगाव
करमाळा
लढवायचा ठरवला परंतु उमेदवार निश्चित होणे बाकी
कन्नड
हिंगोली
वसमत
गंगाखेड
लोहा
कंधार
तुळजापूर
भूम-परांडा-वाशी
पाचोरा
माढा
धुळेश्वर
निफाड
नांदगाव
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आज रात्रीच मतदारसंघ आणि उमेदवार आम्ही जाहीर करणार आहोत. जर रात्रीतून नाही झालं तर सकाळी 7 च्या आत उमेदवार जाहीर करावे लागतील. कारण अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे. राज्यभरातील मतदारसंघातील उमेदवाराना विनंती आहे की, तुमच्या मतदारसंघाचे नाव आलं नाही, तर अर्ज माघं घ्या. गोरगरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर त्रास दिला तर दलित मुस्लिम आणि मराठा मिळून लढणार आहोत. तुम्ही आमच्या उमेदवाराला त्रास दिला, तर तुमच्या पक्षातील सर्व उमेदवार आम्ही पाडणार आहोत. आम्ही मतदानातून ताकद दाखवणार आहेत. आमच्या उमेदवारांना त्रास दिला तर दुसऱ्या जिल्ह्यात तुमचे उमेदवार पाडणार आहोत. लोकांचे हक्काचे लोक असावेत म्हणून आम्ही उमेदवार देत आहोत. दलित, मुस्लिमांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा लिंगायत, वारकरी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोक आम्हाला पाठवायचे आहेत. कर्माचाऱ्यांचा आवाज म्हणून लोक पाठवायचे आहेत. आम्हाला आमचे लोक लोकांना न्याय देण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहेत. मराठ्यांच्या जीवावर लोक उभं करायचे आहेत. जिल्ह्यातल्या मतदारसंघात उमेदवार द्या, असा हट्ट करु नका. एका जातीवर निवडणूक लढणे सोपे नाही. हट्ट धरुन मागणी करु नका. समाज खिंडीत सापडेल, असा हट्ट धरु नका.
Web Title: Seats announced by Jarange Maharashtra Assembly Election 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study