“खासदार डोक्यावर आपटलाय”, आ. थोरातांनी उडवली सुजय विखेंची खिल्ली
Maharashtra Assembly Elections 2024 | Balasaheb Thorat vs Sujay Vikhe: खासदार नगरला आपटला मात्र तो डोक्यावर आपटला हे आता कळालं अशा शब्दात थोरातांनी सुजय विखे यांची खिल्ली उडवली.
संगमनेर: खासदार सुजय विखे यांनी गेल्या काही दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघात अनेक सभा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा घेत विखे पिता पुत्रांवर टिका केली आहे. खासदार नगरला आपटला मात्र तो डोक्यावर आपटला हे आता कळालं अशा शब्दात थोरातांनी सुजय विखे यांची खिल्ली उडवली आहे.
“शिर्डी मतदारसंघ गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आणि दहशतमुक्त करण्यासाठी कार्यक्रम सुरू करायचा आहे. इथे खूप दहशत आणि धाक आहे. गणेश कारखान्याच्या वेळेस दहशतीचे झाकण बरेचसे उघडले. लोकसभेला तर खूपच आऊट झालं, थोडेफार राहिलं असेल तर ते या निवडणुकीत काढून टाकायचे. संगमनेरमध्ये येऊन कुणी काहीही भाषणं केली तरी काळजी करू नका. नगरमध्ये खासदार आपटला, पण आता कळालं तो डोक्यावर आपटला होता. आता कळालं असे भाषणं का व्हायला लागले. डोक्यावर आपटल्यावर अशीच भाषणं होणार,” असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली.
“संगमनेरचे आमचे लोक समर्थ आहेत. जितका बोलाल तेवढं माझं लीड वाढेल. बोल तू, लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. यांच्या सभा म्हणजे गाड्या – घोड्या. नंतर काहीतरी खाटुक खुटुक असतं. लोक उचलायचे, न्यायचे, बसवायचे आणि फोटो काढायचा, आम्ही सगळा समाचार घेऊ, पुरा कार्यक्रम होईल, काळजी करू नका. शिर्डीत दहशतवाद विरोधात आंदोलन सुरु करा, दहशतवाद से आजादी ” हे आपलं या निवडणुकीत घोषावाक्य असलं पाहिजे. हे ज्या पक्षात जातात, त्याचा पदर जाळायचा कार्यक्रम करतात,” असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
Web Title: Assembly Elections 2024 come Thorat made fun of Sujay Vikhe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study