Home महाराष्ट्र “जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली...

“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी

Breaking News:  बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी.

Salman Khan threat came in the name of Lawrence Bishnoi Gang

Salman Khan vs Lawrence Bishnoi Gang:  बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज आला असून यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेले बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था सलमान खानची होईल, असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या मेसेजची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला अशा प्रकारे धमकावलं जात आहे. नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची सोशल पोस्ट शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने केली असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांचे सलमान खानशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा संदेश आला असून त्यामध्ये ५ कोटींच्या खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, ही धमकी गांभीर्याने घेण्यासही बजावलं आहे. “हा मेसेज हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी असणारं वैर त्याला संपवायचं असेल, तर त्याला ५ कोटींची रक्कम द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल”, असं या संदेशात लिहिल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. एएनआयनं यासंदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. पोलिसांनी या संदेशाबात तपासाला सुरुवात केली आहे.

काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावरदेखील दोन अज्ञातांनी गोळीबार करून पळ काढला होता. आता पुन्हा एकदा बाबा सिद्दिकींची हत्या व सलमान खानला धमकी यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई व सलमान खान यांच्यातलं वैर आजचं नसून १९९८ पासूनचं आहे. १९९८ साली सलमान खाननं दोन काळवीटांची शिकार केली होती. बिश्नोई समाजात काळवीटांना पवित्र मानलं जातं. मात्र, त्यांच्या शिकारीमुळे समाजात असंतोष असल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून करण्यात आला आहे. यामुळेच तेव्हापासून बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

Web Title: Salman Khan threat came in the name of Lawrence Bishnoi Gang

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here