आरशावर लिहून पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या
Breaking Suicide News: मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलिस उपायुक्त यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
छत्रपती संभाजीनगर : मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. साहिल शीलवंत नांदेडकर (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. 12 ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता. रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पा मारल्या. त्यानंतर ते सर्वजण झोपी गेले.
नेहमीप्रमाणे उपायुक्त नांदेडकर हे सकाळी 6 वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा मुलगा साहिल झोपेतून उठला नसल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे नांदेडकर यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी चार ते पाच वेळा आवाज दिल्यावरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे जोरात दरवाजा वाजवला. शेवटी त्यांनी बाजूला जाऊन खिडकीतून डोकावून पाहिल्यावर साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ कुटुंबातील इतरांना हा प्रकार कळवला. साहिलने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिस या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत.
Web Title: Deputy Commissioner of Police’s only son commits suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study