Breaking News | Nashik Crime: पतीसह त्याच्या प्रेयसीने ढकलून दिल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना.
ओझर : पतीसह त्याच्या प्रेयसीने ढकलून दिल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीने ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयिताना अटक करण्यात आली आहे. संशयितांना पिंपळगाव न्यायालयाने गुरुवार दि. २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत ओझर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रजनी प्रकाश वालदे (वय ५०, रा. गुड्डीगोदाम, गौतमनगर, नागपूर) या त्यांच्या मुलगी व मुलासोबत सोबत राहत होत्या. तर त्यांचे पती प्रकाश तुकाराम वालदे (वय ६०, रा. जउळके शिवार ता. दिंडोरी) येथे रहातात.
रजनी वालदे यांना आपले पती एका महिलेसोबत मानस अपार्टमेंट, एअरपोर्ट रोड, दहावा मैल, ओझर येथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या मुलगी काजल सोबत दि. १५ सप्टेंबर रोजी ओझर येथे आल्या. यावेळी त्यांना पती प्रकाश वालदे एका महिलेसोबत आढळून आले.
संतापलेल्या रजनी यांनी पती प्रकाश यांना घर खचार्साठी पैसे का देत नाही? याचा जाब विचारल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसन झटापटीत होऊन प्रकाश व त्यांची प्रेयसी संशयित मंदाकिनी नामक महिला यांनी रजनी यांना ढकलून दिल्याने त्या किचन ओट्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्यास मागील बाजुने जबर मार लागला. त्यामुळे त्यांना उचपारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मयत रजनी वालदे यांची मुलगी काजल प्रकाश वालदे हिने ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित प्रकाश वालदे व प्रेयसी मंदाकिनी नामक महिला यांच्याविरोधात रजनी यांच्या मुत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास ओझर पोलीस करीत आहेत.
Web Title: Woman dies, husband and girlfriend arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study