संगमनेरच्या व्यापाऱ्याची ३० लाखांची फसवणूक पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: शेअर मार्केटमध्ये जास्त व्याजाचे आमिष.
संगमनेर: शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवत संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना तीस लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत पती-पत्नीविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके (रा. भिवंडी, ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. फसवणूक झालेले संकेत कोकणे (मेनरोड, संगमनेर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. शशांक वडके व कोकणे यांची भेट मित्रामार्फत झाली. पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास सहा टक्के दराने पैसे मिळतील असे सांगितले. त्यानुसार कोकणे यांनी ठाणेस्थित ग्लोब कम्युनिटीज कन्सल्टन्सी या नावे १६ मे २०१९ रोजी २० लाख रुपये आरटीजीएसद्वारा भरले. त्यानंतर पुन्हा १७ मे २०१९ रोजी ५ लाख रुपये आरटीजीएस द्वारा भरले आणि २० मे २०१९ रोजी २ लाख रुपये रोख रक्कम शशांक वडके यांना दिले.
‘मी तुमचे अकाउंट काढतो आणि स्वतः चालवतो व तुम्हाला सहा टक्के दराने पैसे देतो’ असे शशांक वडकेने सांगितले होते. पैसे उकळण्यासाठी वडकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे नोकरीला असून ग्लोब कॅपिटल मार्केटिंग लिमिटेड कंपनीची पत्नी प्रियंकाकडे एजन्सी असल्याचे भासविले होते. प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये असे पाच सहा महिने कोकणे यांना सुरूवातीला मिळाले. मात्र मिळणारे पैसे तोडके असल्याने कोकणे यांनी वडकेकडे पैसे परत मागण्यासाठी तगादा सुरू केला. पैसे देण्यास टाळाटाळ करत वडके याने मोबाईल बंद करून संपर्क टाळू लागला. त्यानंतर कोकणे यांनी माहिती घेतली असता ग्लोब कॅपिटल मार्केटिंग कंपनीत कुठलेही रजिस्ट्रेशन नसून खातेही उघडले नसल्याचे समोर आले. तगाद्यानंतर अवघे ३ लाख ५४ हजार ८२८ रुपये वडकेने परत दिले. २६ लाख ४५ हजार १७२ रुपयांची वडके पती-पत्नीने फसवणूक केल्याचे कोकणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: 30 lakh fraud of Sangamner businessman Crime against husband and wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study