राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Statement: विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात राष्ट्रवादी विधानसभेला स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Ajit Pawar: राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेत आहेत. विशेष म्हणजे देशात नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात राष्ट्रवादी विधानसभेला स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर अजित पवारांनी एका मुलाखतीत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?
आजतरी राज्यात अशी स्थिती नाही की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येईल, असं सांगत अजित पवारांनी स्वबळावर लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मागच्या कित्येक वर्षात हा एक व्यक्ती आमचा नेता, त्याच्या पाठिशी आम्ही आहोत, असं म्हणत सरकार आलं असं झालेलं नाही. आताच्याही निवडणुकीत सगळ्यांनाच तीन- तीन मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवावी लागते, ही महाराष्ट्राची ओळख आहे, असं अजित पवार म्हणाले.
आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा दोन- दोन पक्षांची आघाडी होती. 40 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, जयललिता, स्टॅलिन, करूणानिधी, अरविंद केजरीवाल या नेत्यांनी स्वबळावर सरकार आणलं तसं महाराष्ट्रात झालेलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
युगेंद्र पवार यांनी बारामतीतून शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. ज्यांना लढायचं ते लढू शकतात, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी यावेळी बोलताना मराठा आऱक्षणावर देखील भाष्य केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर गरीब वर्ग आहे. त्यांनाही इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी शिक्षणासोबतच नोकरीमध्येही आरक्षण मिळायला हवं, असं त्यांनी म्हटलंय.
Web Title: Will the nationalists fight on their own Big statement of Ajit Pawar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study