UPSC ची तयारी करणार्या मराठी युवतीची आत्महत्या
Breaking News | Student Suicide: यूपीएससीची तयारी करणार्या मराठी युवतीनं दिल्लीत आत्महत्या केल्याची घटना.
अकोला: अकोल्यातील एका यूपीएससीची तयारी करणार्या मराठी युवतीनं दिल्लीत आत्महत्या केल्याची घटना 21 जुलै रोजी घडली. अंजली अनिल गोपणारायन असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंजली ही अकोल्यातील गंगानगर परिसरातील रहिवासी आहे. तिचे वडील अनिल गोपनारायण हे पोलीस मुख्यालयात एएसआय आहेत. तिनं बीएससी कृषी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी दिल्लीला यूपीएससीचे क्लासेस करण्यासाठी गेली होती. सुरुवातीला एक वर्ष करोल बाग परिसरात ती राहिली. त्यानंतर गत एक वर्षांपासून ती राजेंद्र नगरमध्ये राहत होती. विशेष म्हणजे अंजलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारेच ती स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीला गेली होती.
यूपीएससीची पूर्व परीक्षा 16 जून रोजी पार पडली. या परीक्षेत अंजलीला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानं ती नाराज होती. त्यात तिच्या घरमालकांनीही राहत्या घराचं भाडं अडीच हजार रुपयांनी वाढवून 18 हजार रुपये केलं होतं. घर भाडे वाढल्यानं अंजली काहीशी तणावात होती. त्यात शिष्यवृत्तीही संपल्यानं तिच्या तणावात आणखीन भर पडली. हा तणाव तिला सहन झाला नाही आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्यापूर्वी अंजलीने सुसाईड नोट लिहिली होती. ज्यात तिने मानसिक तणावासह एका अनोळखी शहरात राहत असताना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याचाही उल्लेख केला होता.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं: तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, “मी खूप प्रयत्न केला. पण या नैराश्यातून बाहेर येण्याऐवजी ते आणखीन भयंकर होत चाललंय. मी डॉक्टरकडेही गेली होते. पण माझे मानसिक आरोग्य सुधारत नाही. पीजी आणि वस्तीगृहाचं भाडं कमी व्हायला हवं. ही लोकं विद्यार्थ्यांचे पैसे लुटत आहेत आणि प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नाही. हे सगळं आता सहनशीलतेच्या पलीकडं गेलं आणि आता बस झालं.” अंजलीने आपल्या मृत्यूपश्चात अवयव दान करण्यात यावं, अशी विनंती सुसाईड नोटमधून कुटुंबीयांकडं केली.
Web Title: Suicide of a Marathi girl preparing for UPSC
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study