अकोलेत होणार का घरवापसी? शरद पवारांच्या उपस्थितीत मधुकर पिचड-वैभव पिचड यांचा आज पक्षप्रवेश?
Ahmednagar News : मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलणार आहेत.
अकोले: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी देखील गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी याआधी देखील तीन वेळा भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची विनंती केली होती, अशी माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे दोघेही हजेरी लावण्याची शक्यता आहे.
मधुकर पिचड आणि त्यांचे चिंरजीव माजी आमदार वैभव यांनी सन 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे हे विजयी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी स्वतंत्र चूल मांडून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले आहेत.
मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं आहे. 2019 साली राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला होता. आज किरण लहामटे महायुतीसोबत असल्यामुळं अकोले विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेत पिचड कुटुंबीयांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलणार आहेत. पिचड यांनी जर पक्षप्रवेश केला तर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: Madhukar Pichad-Vaibhav Pichad joined the party today in the presence of Sharad Pawar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study