Breaking News | Sangamner: गरोदर महिला पॉझिटिव्ह, संगमनेरमधील एका रुग्णावर नाशिकमध्ये उपचार सुरू असताना तेथील खासगी रुग्णालयाने केलेल्या तपासणीत त्याला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर.
संगमनेर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत.राज्यात सर्वात जास्त रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. दीड महिन्यापूर्वी संगमनेरमध्ये एक रुग्ण आढळला होता. आता पुन्हा दोन गरोदर महिलांचे अहवाल झिका पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, यामुळे आरोग्य यंत्रणा मात्र संगमनेरमध्ये अलर्ट झाली आहे.
साधारण दीड महिन्यांपूर्वी संगमनेरमधील एका रुग्णावर नाशिकमध्ये उपचार सुरू असताना तेथील खासगी रुग्णालयाने केलेल्या तपासणीत त्याला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, तो रुग्ण बरा होऊन संगमनेर येथे परतल्यानंतर नाशिक महापालिकेने पुन्हा रुग्णाचे रक्त नमुने घेऊन ते तपासले असता त्याला झिका होऊन गेल्याचे समोर आले होते. यात सुमारे महिनाभराचा कालावधी गेल्यानंतर नाशिक मनपा आरोग्य विभागाने नगर जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत कळवले होते. त्यानुसार नगर आरोग्य विभागाने संगमनेर शहरात राहणारा रुग्ण आणि त्याच्या रहिवासी भागातील गरोदर २७ महिलांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले होते.
तपासणीअंती यातील दोन गरोदर महिलांचे नमुने झिका पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र, या गरोदर महिलांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. झिका विषाणूचा प्रादुर्भाव गरोदर महिलांमधील बाळाला होत असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित महिलांची सोनोग्राफी केलेली आहे. त्यातही काही धोका नसल्याचे समोर आले आहे. मात्र, उपाययोजना म्हणून आता आरोग्य विभाग या दोन गरोदर महिलांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणार आहे. तसेच संगमनेर दोन दिवसांपासून पुन्हा नव्याने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत झिकाचे तीन रुग्ण आढळले असून ते तिघेही संगमनेर शहरातील आहेत. दीड महिन्यापूर्वी एक पुरुष रुग्ण झिका पॉझिटिव्ह आढळला होता. त्या रुग्णाची पत्नी परदेशातून आलेली होती. दरम्यान, आताही त्याच परिसरातील दोन गर्भवती महिला झिका पॉझिटिव्ह आल्या आहेत. अज् काही गरोदर महिलांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत संगमनेरमध्ये स्वाइन फ्ल्यूचा एक रुग्ण सापडला असल्याचेही त्यांनी सांगितले.
झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?
झिकाची लागण झाल्यास मृत्यूचं प्रमाण कमी असतं. दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणं आढळतात.
- हलकासा ताप
- डोळे लाल होणे आणि सुजणे
- डोकेदुखी
- पायांचे गुडघेदुखी
- शरीरावर लाल चट्टे येणे
आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.
पण, या व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात.
Web Title: 2 Zika patients in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study