साडी, सफारी कापड, नथ वाटपाची होणार चौकशी
Breaking News | Ahmednagar: नथ, कापड वाटपाच्या बातमीच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करून प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी. नाशिक विभागीय आयुक्तांचा आदेश.
अहमदनगर : नाशिक शिक्षक मतदार संघात शिक्षकांना पैठणी, सफारीचे कापड व नथ वाटप होत असल्याचे प्रकार घडले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्वरीत चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणूक नाशिक शिक्षक मतदारसंघात सफारी कापड, नथ वाटप होत असल्याची चर्चा होती. याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी थेट केंद्र व राज्याच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील आचार संहिता कक्षाचे प्रमुख तथा उपायुक्त प्रज्ञा बडे-निसाळ यांनी नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार आणि धुळे अशा पाचही जिल्ह्यातील सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना रविवारी (दि. २३) सदर वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक विभागात महाराष्ट्र विधान परिषद नाशिक शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता सुरू आहे. नथ, कापड वाटपाच्या बातमीच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करून प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी. तसा अहवाल कार्यालयास सादर करावा. तसेच अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. आपल्या आचार संहिता संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून आचार संहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. सदरची बातमी ही जळगाव जिल्ह्यातील असली तरीही विभागातील अन्य जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याबाबत योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आदेशात म्हटले आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २६) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीच्या आदेशाने वाटप करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.
Web Title: There will be an inquiry into the distribution of saree, safari cloth, Nath
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study