संगमनेर: तोल जाऊन कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू
Breaking News | Sangamner: कालव्यात तोल जाऊन पडल्याने ४३ वर्षीय नागरिकाचा पाण्यात बुडून मृत्यू.
संगमनेर: कालव्यात तोल जाऊन पडल्याने ४३ वर्षीय नागरिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील अंभोरे येथे अंभोरे – डिग्रस रस्त्याच्यापुलाजवळ निळवंडे उजव्या कालव्यात ही दुर्घटना रविवारी घडली, मात्र मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळला. राधाकिसन विठोबा खेमनर असे मृताचे नाव आहे.
निळवंडे उजव्या कालव्याचे काही दिवसांपासून आवर्तन सुरू आहे. अंभोरे येथे उजव्या कालव्याशेजारील रहिवासी राधाकिसन (अण्णा) विठोबा खेमनर हे रविवारी पाटाच्याकडेने घराकडे पायी जात असताना तोल जाऊन ते पाटाच्या पाण्यात पडले. ही दुर्घटना नेमके किती वाजता घडली, हे मात्र समजू शकले नाही. दुर्दैवाने हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाटाच्याकडेने येणाऱ्या जाणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाईपला अडकलेला मृतदेह पाहिला.
ही माहिती तत्काळ सरपंच व पोलिस पाटलास देण्यात आली. पो. पा. विनोद साळवे व सरपंच भाऊसाहेब खेमनर यांनी तालुका पोलिसांना ही माहिती दिली. पो. नि. देविदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. पल्लवी वाघ, पो. काँ. दत्तात्रय दिघे, मीरा बिबवे, ओंकार शेंगाळ हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गावातील तरुणांनी मदत केली. मृतदेह शव विच्छेदानासाठी घुलेवाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात पिण्यासाठी उजव्या कालव्यात शेतीसाठी आवर्तन सोडले आहे. जोर्वे येथील चेतन सचिन लोणारी (१७) हा युवक पोहण्यास गेला असता पाण्यात बुडून मृत पावला. ही दुर्घटना ५ मे रोजी घडली. रविवारी (दि. १९) रोजी दुपारी संगमनेर शहरात छोट्या पुलाजवळ तोल जाऊन गौतम दगडू यरमल (३५, रा. संगमनेर खुर्द) हा तरुण तर सोमवार (दि. २०) रोजी राधाकिसन खेमनर (४३, रा. अंभोरे) अशा तिघांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. एका आवर्तनात तिघा जणांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Drowning due to falling into the canal
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study