अहमदनगर: एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Breaking News | Ahmednagar: एसटी बस व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना.
श्रीगोंदा: मुंबई-बीड राष्ट्रीय महामार्गावरील आढळगाव शिवारात एसटी बस व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त झालेले मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी साडेपाच तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. गौतम जयवंत छत्तीसे (वय ४१, रा. छत्तीसेवस्ती, श्रीगोंदा) असे अपघातातील मृताचे नाव आहे. जामखेडवरुन पुण्याच्या दिशेने जाणारी एसटी बस (क्र. एएच ११ बीएल ९२३९) व आढळगावातून भावडीच्या दिशेने निघालेली दुचाकी (क्र. एमएच १२ सीएक्स ७२४०) यांची गुरुवारी सकाळी समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील गौतम छत्तिसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मयत झाले.
आढळगाव ते जामखेड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. येथील डोकेवाडी फाट्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक हिरडगाव, शिदा, बिटकेवाडीमार्गे वळविली आहे. त्यासाठी डोकेवाडी फाट्यावर रस्त्यावर मुरुमाचा मोठा भराव टाकला आहे. त्यामुळे मयत गौतम यांचे नातेवाईक, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य
अनिल ठवाळ, सरपंच शिवप्रसाद उबाळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, अमर छत्तिसे, संतोष सोनवणे, पोपट छत्तिसे यांच्यासह ग्रामस्थांनी या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी ठेकेदार एजन्सी अपघाताला जवाबदार असल्याचा दावा केला. महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी आणि एजन्सीचे प्रतिनिधी यांनी नुकसान भरपाई दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आढळगावातील तरुणांनी महामार्गावरील वाहतूक रोखली. सुमारे साडेपाच तास वाहतूक बंद होती. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी, ठेकेदार एजन्सीचे उपस्थित अधिकारी आणि मयताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. ठेकेदार एजन्सीने मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. दुपारी रास्ता रोको मागे घेण्यात आला. सुनील छत्तिसे यांच्या फिर्यादीवरून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशी
अचानक समोर आलेल्या दुचाकीमुळे एसटी चालकास अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्यावरुन घसरली. परंतु, चालकाने प्रसंगावधान दाखवत बस पुन्हा रस्त्यावर आणल्यामुळे विद्यार्थ्यांसह २५ ते ३० प्रवाशी बचावले.
ठेकेदार संस्थेचा बेजबाबदारपणा
वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे, त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात सतत सुरू आहेत. एजन्सी वेजबाबदारपणे काम करत असल्यामुळेच असे अपघात होत आहेत.
Web Title: Bike rider killed in collision with ST Accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study