संगमनेर: पोटचा मुलगा विहिरीत पडला, आईने विहिरीत उतरत वाचविला मुलगा
Breaking News | Sangamner: विहिरीत पडल्याची माहिती आईच्या कानी पडताच ती जीवाची पर्वा न करता विहिरीत सोडलेल्या वायर रोपने विहिरीत उतरली अन् पाण्यात गटांगळ्या खात असणाऱ्या मुलाचा जीव वाचविण्याचे धाडस आईने दाखविल्याची आगळी वेगळी घटना.
संगमनेर : महिला दिनी एक आई ठरली हिरकणी. पोटचा मुलगा खेळता खेळता ६० फूट विहिरीत पडल्याची माहिती आईच्या कानी पडताच ती जीवाची पर्वा न करता विहिरीत सोडलेल्या वायर रोपने विहिरीत उतरली अन् पाण्यात गटांगळ्या खात असणाऱ्या मुलाचा जीव वाचविण्याचे धाडस आईने दाखविल्याची आगळी वेगळी घटना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुकला जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडली.
तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे राहणारे नवनाथ गडाख परिवारातील साईनाथ व पूनम गडाख हे बहीण-भाऊ घरासमोरच आंधळी कोशिंबीरचा खेळ खेळत होते. हवेच्या झोताचा अंदाज न आल्याने साईनाथ हा ६० फूट विहिरीचे उंच कठडे ओलांडून विहिरीत पडल्याचे त्याची बहीण पूनमने पाहिले. त्यानंतर तिने भाऊ विहिरीत पडला असे ओरडत ओरडत जाऊन आईला सांगितले. पोटचा गोळा विहिरीत पडल्याचे कानी पडताच आई सुनीता गडाख हिने क्षणाचाही विलंब न लावता धावत जाऊन थेट विहीर गाठली आणि विहिरीत मोटार सोडलेल्या वायर रोपने ५० फूट विहिरीमध्ये खाली उतरली.
साईनाथला पोहता येत नसल्यामुळे नाका-तोंडात पाणी जाऊ न देता तो श्वास रोखत पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करत आईलाही धीर देत होता. आईने थोडं अंतर ठेवत त्याला वीजपंपाच्या पाईपच्या दिशेने ढकलत पाइपला धरायला सांगितले आणि तीही स्वतः त्या दिशेने पोहोचत लोखंडी रोप-वेने खाली विहिरीत उतरली. विहिरीत उतरत असताना तिच्या हाता- पायाला जखमा झाल्या होत्या. स्वतःच्या शरीराची पर्वा न करता आईने मुलाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मुलाचे वडील नवनाथ गडाख यांनी घरून आणलेली दोरी विहिरीत सोडली. सुनीताने पाण्यात पाईपचा आधार घेत साईनाथच्या कमरेला ती दोरी बांधली. गडाख यांनी पहिल्यांदा साईनाथला त्यानंतर पत्नी सुनीता हिला रहाटावर दोर टाकून वर काढण्यात आले.
Web Title: son fell into the well, the mother saved the son by going down into the well
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study